आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय अद्याप बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र दिसतंय. टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी काय निर्णय घेतंय याकडे बीसीसीआयचं लक्ष्य आहेच. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांनी विश्वचषकाचं आयोजन करण्याबाबत असमर्थता दर्शवल्यानंतर बीसीसीआयच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र यानंतर पाक क्रिकेट बोर्डाने, ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आशिया चषकाचं आयोजन करण्याचं ठरवत बीसीसीआयच्या मार्गावर अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे.

२८ जूनरोजी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावरुन पाकिस्तानी संघ २ सप्टेंबरला परतणार आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत आशिया चषकाचं आयोजन केलं जाईल. पाकिस्तानात सध्या करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासाठी UAE किंवा श्रीलंकेत या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं, असं वक्तव्य पाक क्रिकेट बोर्डाचे सीईओ वासिम खान यांनी एका मुलाखतीत केलं होतं. मात्र याच कालावधीत बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याचा विचार करत असल्यामुळे, बीसीसीआयने पाक क्रिकेट बोर्डाला PSL चं आयोजन पुढे ढकलत त्या जागी आशिया चषकाचं आयोजन करण्याची विनंती केली होती.

बीसीसीआयने केलेल्या या विनंतीला पाक क्रिकेट बोर्डाने नकार दर्शवला असून, यंदाचा आशिया चषक त्रयस्थ स्थानावर खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयने दिलेल्या प्रस्तावावर कोणताही विचार केला जाणार नाहीये. PSL चं आयोजन पुढे ढकलण्याचा कोणताही विचार नाही. पाक क्रिकेट बोर्डातील सुत्रांनी news.co.pk शी बोलताना माहिती दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे यंदाच्या आशिया चषकाचं यजमानपद देण्यात आलं असून आयसीसीने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेचं आयोजन होणार होतं. त्यामुळे या नवीन पेचावर बीसीसीआय काय उत्तर शोधतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.