भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रस्तावित क्रिकेट मालिकेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) प्रमुख शहरयार खान निराश झाले आहेत. आम्ही हे प्रकरण आता बंद करीत आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत.

बीसीसीआयने अंतिम निर्णय घ्यावा, याकरिता शहरयार यांनी बीसीसीआयला पत्र लिहून ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र या पत्रालाही बीसीसीआयकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे पीसीबी सोमवारी आपला अंतिम निर्णय घेऊ शकणार आहे.
‘‘शनिवारी संध्याकाळपर्यंत आम्हाला बीसीसीआयकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण आम्ही बंद करीत आहोत. या संदर्भात सोमवारी घोषणा करण्यात येणार आहे,’’ असे शहरयार यांनी ‘डॉन’ वृत्तपत्राला सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भारताविरुद्ध मालिका खेळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले होते. आम्ही बीसीसीआयच्या विनंतीनुसार खेळण्याचे ठिकाण संयुक्त अरब अमिराती हे बदलून श्रीलंकासुद्धा केले होते. परंतु आमचे प्रयत्न वाया गेले आहेत. भारताविरुद्ध नियमित क्रिकेट मालिका व्हाव्यात, या हेतूने आम्ही बीसीसीआयशी सामंजस्य करार केला आहे.’’
‘‘भारत-पाकिस्तान मालिका होत नसल्यामुळे या दोन देशांतील तसेच जगभरातील कोटय़वधी क्रिकेटरसिकांची निराशा होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये (आयसीसी) आम्ही याबाबत आवाज उठवू,’’ असे त्यांनी सांगितले.