नियंत्रण रेषेवरील वाढत्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळा (पीसीबी)ची चिंता वाढली आहे. चॅम्पियन लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा १७ सप्टेंबरपासून सुरू होत असून, पाकिस्तानमधील फैसलाबाद व्होल्व्हज संघाचा सहभाग धूसर दिसत आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदच्या सुटीनंतर आम्ही फैसलाबाद संघाच्या व्हिसा प्रक्रियेला प्रारंभ करणार आहोत. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये चॅम्पियन्स लीगमधील फैसलाबाद संघाच्या समावेशाबाबत साशंकता निर्माण करण्यात आली आहे. परंतु मला फैसलाबाद संघाच्या सहभागाविषयी कोणतीही समस्या वाटत नाही.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या संपर्कात आहोत. त्यामुळे फैसलाबाद संघाला व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, अशी आशा आहे.’’
मिसबाह-उल-हक फैसलाबाद संघाचा कर्णधार आहे. तो झिम्बाब्वेहून थेट भारतात चॅम्पियन्स लीगसाठी रवाना होणार आहे. गतवर्षी बीसीसीआयने पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीत सहभागासाठी परवानगी दिली होती.