चिंटू, लंबू, जॅक्स अशा हाका क्रिकेटच्या मैदानावर ऐकायला मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण ही टोपणनावे विविध क्रिकेटपटूंनाच मिळाली आहेत. एकमेकांना अवघड नावाने हाक मारण्याऐवजी अशा टोपणनावानेच हाक मारणे खेळाडूंना सोपे वाटू लागले आहेत. तशी टोपणनावाने हाक मारण्याची परंपरा क्रिकेटला नवीन नाही. दिवंगत खेळाडू मन्सूर अली खान पतौडी हे ‘टायगर’ पतौडी नावाने ख्यातनाम होते तर सुनील गावस्कर यांना ‘सनी’ म्हणून ओळखले जाते. अनिल कुंबळे हा ‘जम्बो’ नावाने प्रसिद्ध आहे. सध्याच्या काळातील महेंद्रसिंह धोनी हा ‘माही’ नावाने तर सुरेश रैना हा ‘सानू’ नावाने ख्यातनाम आहे. विराट कोहली व युवराज सिंह यांना अनुक्रमे ‘चिकू’ व ‘युवी’ हे टोपणनाव लाभले आहे. उंचापुरा असलेला गोलंदाज इशांत शर्मा याला ‘लंबू’ अशी उपाधी लाभली आहे.  
आयपीएल स्पर्धाही अशा टोपणनावांना अपवाद नाही. स्पर्धेत खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंची नावे उच्चारणे कठीण जाते. त्यामुळे ते भारतीय खेळाडूंना टोपणनावानेच हाक मारणे पसंत करतात. चेतेश्वर पुजारा हा ‘पूज’ किंवा ‘चिंटू’ नावाने लोकप्रिय झाला आहे, तर प्रवीण तांबे याला ‘पीटी’ असे टोपणनाव मिळाले आहे. राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू शेन वॉर्न याने अिजक्य राहणेला दिलेल्या ‘जिंक्स’ या टोपणनावाने तो संघात लोकप्रिय आहे.