गेल्या दोन-तीन महिन्यात करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र लॉकडाउन आहे. परिणामी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे चित्र आहे. सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेची चर्चा सध्या हळूहळू रंगू लागली आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी काही माजी खेळाडूंनी आणि क्रिकेट जाणकार व समालोचकांनी भारताचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. त्यात समालोचक आकाश चोप्रा याने टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा १४ खेळाडूंचा संघ घोषित केला होता. विशेष म्हणजे या संघात भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या दोघांना संधी देण्यात आली नव्हती. त्यावरून आकाश चोप्राला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले.

आकाश चोप्राने माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याच्याशी लाइव्ह चॅटद्वारे संवाद साधला. या गप्पांदरम्यान त्याने धोनीला संघातून वगळण्याबाबतचा प्रसंग सांगितला. “मी जाहीर केलेल्या संघात धोनीचा समावेश नव्हता. त्यामुळे मला लोकांनी खूप सुनावलं. लोक इथेच थांबले नाहीत. त्यांनी माझ्या मुलांनाही शिव्या-शाप दिले. मी लोकांना विनंतीदेखील केली की जे झालं ते झालं, आता सोडून द्या तो विषय, पण लोकांनी ऐकलं नाही. माझ्यावर टीका सुरूच राहिली. शेवटी मला काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहावं लागलं”, असा वाईट अनुभव आकाश चोप्राने आगरकरशी बोलताना सांगितला.

आकाश चोप्राने सलामीवीराच्या जागेसाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना संघात समाविष्ट केले होते. कर्णधार विराट कोहलीला संघात स्थान तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिले होते. चौथ्या क्रमांकासाठी त्याने युवा श्रेयस अय्यर तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला पसंती दर्शवली होती. पण अनुभवी महेंद्रसिंग धोनीला त्याने संघातून वगळले होते. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली.

याशिवाय, संघात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे दोघांचीही निवड केली होती. तसेच तिसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून रविंद्र जाडेजा यालाही स्थान दिले होते. गोलंदाजांच्या यादीत युजवेंद्र चहलचे स्थान निश्चित होते, पण कुलदीप यादवबाबत तो साशंक होता. वेगवान गोलंदाजांच्या यादीत त्याने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीसह दीपक चहर असे चारही गोलंदाज समाविष्ट केले होते.