Ind Vs Eng : भारतीय कर्णधार विराट कोहलीने बुधवारी नॉटींग्हॅम तिसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर आपल्या संघाने कधीही स्वत:वर विश्वास ठेवणं बंद केलं नव्हतं असं म्हटलं आहे. यासोबत त्याने सांगितलं की, पहिल्या दोन सामन्यांमध्ये इंग्लंड संघाकडून झालेल्या पराभवानंतर अनेकांचा संघावरील विश्वास उडाला होता. भारतीय संघाने इंग्लंडविरोधातील तिसरा कसोटी सामना 203 धावांनी जिंकला आहे.

सामन्यात एकूण 200 धावा करणाऱ्या विराट कोहलीने (97 आणि 103) पुढे बोलताना सांगितलं की, ‘आम्ही मालिकेत 0-2 ने मागे होतो आणि अनेकांचा आमच्यावरील विश्वास उडाला होता. पण आम्हाला स्वत:वर विश्वास होता आणि याचमुळे आता हे अंतर 2-1 झालं आहे. ड्रेसिंग रुममध्ये आम्ही काय विचार करतोय हे महत्त्वाचं असतं. बाहेर लोक काय विचार करतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आता आम्हाला मालिका जिंकू शकतो असा विश्वास आहे’.

‘मालिकेच्या दृष्टीने हा विजय खूप महत्त्वाचा होता. आम्ही सर्वच विभागांमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. हा संपूर्ण ड्रेंसिंग रुमचा विजय आहे’, असंही विराटने सांगितलं आहे. तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी केल्याने विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आलं.

2014 मध्ये फलंदाजीत अपयशी ठरल्याचं ओझं आता उतरलं आहे का असं विचारलं असता त्याने सांगितलं की, ‘मी 2014 मधील अपयशाचा विचार केलेला नाही. मात्र संघाच्या विजयात मोलाचा वाटा दिल्याने आनंदी आहे’. विराटने पुन्हा एकदा अनुष्काला आपल्या चांगल्या खेळीचं श्रेय दिलं आहे.

‘मी माझी खेळी पत्नीला समर्पित करतो. ती मला नेहमीच प्रेरणा देत असते. तिने भुतकाळात खूप काही सहन केलं आहे, त्यामुळे याचं श्रेय तिलाच आहे. ती नेहमीच मला चांगल्या खेळीसाठी प्रेरणा देत असते’, असं विराटने सांगितलं आहे.

कोहलीने सांगितलं की, गोलंदाजांनीही चांगली खेळी केली आणि फलंदाजांनी योग्य वेळेत योगदान दिलं. संघात कोणतीही भीती नाही आहे. आम्ही चांगल्या धावा केल्या आणि गोलंदाजांनी चांगली खेळी केली. सोबतच स्लिपमध्ये चांगले झेल घेत आम्ही हा सामना जिंकला.