भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर हरभजन सिंगने आपल्या टीकाकारांना जोरदार उत्तर दिलंय. “मला कोणासमोर काहीही सिद्ध करण्याची गरज नाहीये, मला खेळायची इच्छा आहे म्हणून अजूनही खेळतोय” असं भज्जीने वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना म्हटलं. “अनेकजण विचार करतात की, ‘भाई ये क्यों खेल रहा है’, पण हा त्यांचा विचार आहे…मी अजून खेळू शकतो, त्यामुळे खेळत राहीन” असं हरभजन म्हणाला.

जितकं क्रिकेट शिल्लक राहिलंय त्याचा आनंद घ्यायचाय, असं हरभजनने सांगितलं. पीटीआयशी बोलताना हरभजन म्हणाला, “अनेकजण विचार करतात की, ‘भाई ये क्यों खेल रहा है.’ अरे भाई ये उनकी सोच है मेरी नहीं’. मला वाटतं की मी अजून खेळू शकतो त्यामुळे मी खेळत राहीन. मला आता कोणासमोर काहीही सिद्ध करण्याची गरज नाहीये…माझा हेतू चांगलं खेळणं आणि मैदानात खेळाची पूर्ण मजा घेणं हा आहे. क्रिकेट खेळूनच मला अजूनही समाधान मिळतं”, असं भज्जीने सांगितलं. पुढे बोलताना, “मी माझ्यासाठी काही लक्ष्य ठरवले आहेत, पण ते पूर्ण करण्यास जर मी अपयशी ठरलो तर इतर कुणालाही नाही तर मलाच प्रश्न विचारेल की मी खरंच पूर्ण प्रयत्न केला होता का” असं हरभजन म्हणाला. “होय मी आता २० वर्षांचा नाहीये…त्यामुळे तेव्हा करायचो तसा सराव आता नाही करणार…मला माहितीये माझं वय ४० झालंय, पण मी अजूनही फिट आहे हेही मला माहितीये आणि या स्तरावर यशस्वी होण्यासाठी जे करायला लागतं ते नक्कीच करेन”, अशा शब्दात हरभजनने आपल्या टीकाकारांना सुनावलं.

आणखी वाचा- IPL 2021 : धोनीच्या CSK ला मोठा धक्का, आयपीएलमधून तिसऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने घेतली माघार

दरम्यान, आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी जेमतेम ९ दिवस शिल्लक राहिलेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या जर्सीत दिसलेला भज्जी यावेळी कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.