भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी सध्या टीकेचं लक्ष्य बनला आहे. विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीदरम्यान धोनीला संथ फलंदाजीमुळे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. धोनी विश्वचषक संघात जागा अडवून बसला आहे, अशा आशयाचा चर्चाही सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र भारताचा माजी फुटबॉलपटू बायुचंग भुतिया धोनीच्या समर्थनार्थ उभा राहिला आहे.

“माझ्या मते धोनी चांगला खेळ करतो आहे. त्याच्यावर टीका करणारी लोकं दुसऱ्या गोष्टीचा राग त्याच्यावर काढतायत असं वाटतंय. सध्या त्याला बळीचा बकरा बनवण्याचं काम सुरु आहे. मात्र विश्वचषकात आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये धोनीने चांगला खेळ केला आहे.” भुतिया कोलकात्यात फुटबॉल प्लेअर असोसिएशनच्या कार्यक्रमात बोलत होता.

यावेळी बोलत असताना भुतियाने आगामी वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी आशियाई देशांचा वरचष्मा राहण्याची शक्यता वर्तवली आहे. आगामी १० वर्षात नेपाळ, भूतान सारखे देशही विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताना दिसतील, असं भुतिया म्हणाला. ऑस्ट्रेलियानंतर उपांत्य फेरी गाठणारा भारत दुसरा संघ ठरला आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर पुन्हा एकदा यजमान इंग्लंडचं आव्हान येण्याची शक्यता आहे.