23 August 2019

News Flash

कामगिरीचे आर्थिक मूल्यांकन करताना वर्तनाचीही दखल घ्यावी!

कोणतीही किंमत मोजून विजय हवाच, अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची विचारसरणी होती.

| August 14, 2019 04:50 am

चेंडू फेरफार प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संस्कृतीचा आढावा घेणाऱ्या डॉ. लाँगस्टाफ यांची शिफारस

मुंबई : खेळाडूचे आर्थिक मूल्यांकन करताना मैदानावरील कामगिरी हा एक निकष असतो. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच्या बाबतीत त्याची वृत्ती आणि मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील वागणूक यांचीही दखल घेणे आवश्यक आहे, अशी शिफारस डॉ. सिमॉन लाँगस्टाफ यांनी केली आहे.

कोणतीही किंमत मोजून विजय हवाच, अशी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची विचारसरणी होती. मात्र मार्च २०१८ मध्ये चेंडू फेरफार प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घातल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला खडाडून जाग आली. मग त्यांनी ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या संस्कृतीचा आढावा’ हा अहवाल लाँगस्टाफ यांच्याकडून मागवला. याच लाँगस्टाफ यांचे मंगळवारी मुंबईच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्यालयात एक विशेष व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला प्रशासकीय समितीचे सदस्य, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे कार्यकारी प्रमुख राहुल द्रविड, आदी मातब्बर मंडळी उपस्थित होती.

‘‘जर खेळाडूची वृत्ती आणि वागणूक यांची दखल घेऊन त्यांचे आर्थिक मूल्यांकन केले नाही, तर तो विजयाच्या ईष्र्येने मर्यादांचे उल्लंघनही करू शकतो.’’ असे लाँगस्टाफ यांनी सादर केलेल्या १४५ पानी अहवालात नमूद केले आहे.

First Published on August 14, 2019 1:29 am

Web Title: performance incentives should be linked to character say dr longstaff zws 70