उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे मला क्रिकेट खेळण्यापासून निलंबित करण्यात आले. हा काळ माझ्यासाठी खूपच क्लेशकारक होता, अशी प्रतिक्रिया भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने व्यक्त केली.

२० वर्षीय पृथ्वीवर गतवर्षी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आठ महिन्यांची बंदी घातली होती. खोकल्यावर उपचार म्हणून घेतलेल्या औषधात टब्र्यूटलान उत्तेजकाचा अंश आढळल्याने पृथ्वीला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती.‘‘माझ्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक होती. मुख्य म्हणजे क्रिकेटपासून दूर राहणे माझ्यासाठी फारच क्लेशकारक होते. सतत कोणीतरी माझा छळ करत आहे, असेच मला वाटायचे,’’ असे पृथ्वी म्हणाला. दिल्ली कॅपिटल्सच्या इन्स्टाग्राम खात्यावर चाहत्यांशी थेट संवाद साधताना पृथ्वी याने अनेक आठवणींनाही उजाळा दिला.

‘‘ज्या वेळी माझ्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा सर्वप्रथम तर सर्व काही संपल्यासारखे वाटले. परंतु मी स्वत:वरील विश्वास ढासळू दिला नाही. लंडनला जाऊन मी माझ्या शारीरिक तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेतली. मला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास मनाई करण्यात आल्याने घरच्या घरीच मी सराव सुरू ठेवला. अखेरीस ज्या वेळी मी स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, त्या वेळी माझी धावांची भूक अधिक वाढलेली होती. म्हणूनच माझे दुसरे रूप चाहत्यांना पाहायला मिळाले,’’ असेही पृथ्वी याने सांगितले.

‘‘आपल्यापैकी अनेकांना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी संयम बाळगता येत नाही. परंतु आता वेळच अशी आली आहे की संयम आणि धीर बाळगल्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या काळात मी घरीच क्रिकेटचा सराव करण्याबरोबरच वडिलांना जेवण बनवण्यासाठीही साहाय्य करतो,’’ असे पृथ्वी याने मानसिक तंदुरुस्तीचे महत्व सांगताना म्हटले.