संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात येणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामासाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान ३० ते ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत अमिराती क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशशिर उस्मानी यांनी व्यक्त केले.

‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी काही दिवसांपूर्वी स्पर्धेच्या आयोजनाची तारीख जाहीर केले; परंतु १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या ‘आयपीएल’चे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी द्यायची की नाही, याविषयी अंतिम निर्णय अमिराती शासन तसेच क्रिकेट मंडळाचा असेल, असेही पटेल यांनी सांगितले होते. शुक्रवारी उस्मानी याविषयी अमिराती क्रिकेट मंडळाची भूमिका मांडली.

‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केंद्र शासनाकडून ‘आयपीएल’च्या आयोजनाची परवानगी अद्याप मिळालेली नाही; परंतु आम्ही आमच्या परीने ‘आयपीएल’ आयोजनाच्या तयारीला प्रारंभ केला आहे. अमिराती शासनाकडे आम्ही स्पर्धेच्या आयोजनाचा अहवाल सुपूर्द केला आहे,’’ असे उस्मानी म्हणाले.

‘‘निश्चितच ‘आयपीएल’ ही एक व्यावसायिक स्पर्धा असल्याने या स्पर्धेसाठी येथील प्रेक्षकांना प्रवेश देण्यात यावा, यासाठी अमिराती क्रिकेट मंडळ प्रयत्नशील आहे. स्टेडियमच्या एकूण प्रेक्षकक्षमतेपैकी किमान ३० ते ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची मुभा द्यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केला आहे. याबाबत त्यांच्याकडून लवकरच उत्तर येईल, अशी आशा आहे,’’ असेही उस्मानी यांनी सांगितले.

२ ऑगस्ट रोजी ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीची बैठक रंगणार असून यामध्येच स्पर्धेशी निगडित अनेक निर्णय घेण्यात येण्याचे अपेक्षित आहे. ‘आयपीएल’च्या ३-४ आठवडय़ांपूर्वीच सर्व संघांतील खेळाडू अमिरातीत दाखल होणार आहेत. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा २०१४ नंतर पुन्हा अमिरातीत ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात येणार आहे.

‘‘गतवर्षी आम्ही १४ संघांचा समावेश असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरींचे आयोजन यशस्वीपणे करून दाखवले. त्यामुळे यंदा ‘आयपीएल’च्या आयोजनातसुद्धा आमचे १०० टक्के योगदान देऊ. त्याशिवाय या स्पर्धेच्या आयोजनामुळे अमिरातीला क्रिकेट मंडळाच्या अर्थचक्राला अधिक चालना मिळणार आहे,’’ असेही उस्मानी म्हणाले.

आफ्रिकन खेळाडूंच्या समावेशाबाबत संभ्रम

दक्षिण आफ्रिकेतील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याशिवाय तेथील शासनाने हवाई वाहतुकीवरही निर्बंध आणल्याने आफ्रिकन खेळाडूंच्या ‘आयपीएल’मधील समावेशाबाबत साशंकता कायम आहे. परंतु गरज पडल्यास आम्ही खेळाडूंना आफ्रिकेतून थेट अमिरातीत नेण्यासाठी वैयक्तिक विमान पाठवण्यास सज्ज आहोत, असे एका फ्रँचायजीच्या मालकाने सांगितले. एबी डी व्हिलियर्स, फॅफ डय़ूप्लेसिस, क्विंटन डी कॉक, लुंगी एन्गिडी, कॅगिसो रबाडा यांसारखे खेळाडू ‘आयपीएल’मध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करतात.

संघ व्यवस्थापन चमूत कपात

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘आयपीएल’च्या आठ संघांतील संघ व्यवस्थापन चमूत कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. साधारणपणे एका संघात २५-२५ खेळाडू आणि प्रशिक्षक व अन्य व्यवस्थापक मिळून एकूण ३५ जणांचा चमू असतो; परंतु प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी यापैकी १५ खेळाडू आणि पाच संघ व्यवस्थापनाचे कर्मचारी यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. अधिक जमाव टाळण्याकरता तसेच सुरक्षित अंतराच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

भारताबाहेर खेळणे निराशाजनक -स्मिथ

सिडनी : करोनामुळे यंदा ‘आयपीएल’ भारताबाहेर खेळवावी लागणे, हे फार निराशाजनक आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने व्यक्त केले. ‘‘एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे आम्हाला अनिवार्य आहे. परंतु ‘आयपीएल’ खेळण्याचा खरा आनंद भारतातच येतो. तेथील प्रेक्षक आणि स्टेडियम्सशी एक वेगळेच नाते जोडले गेल्याने यंदा भारताबाहेर खेळणे निराशाजनक असेल,’’ असे स्मिथ म्हणाला.