नवी दिल्ली :देशाचे प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक आवडी-निवडी निर्थक ठरतात, असे मत भारताची कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राजने रविवारी व्यक्त केले. मी आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यातील वादग्रस्त भूतकाळ मागे टाकून आम्ही संघाच्या भविष्याच्या दृष्टीने पुढे जात आहोत, असे मितालीने सांगितले.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी मिताली भारतीय संघासह विलगीकरणात आहे. सात वर्षांनंतर भारतीय संघ प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोवार यांच्या मार्गदर्शनाखालील ही पहिलीच मालिका आहे. २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने उपांत्य सामना गमावल्यानंतर पोवार यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मितालीला त्या सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांवर व्यावसायिकपणाचा अभाव असल्याचा आरोप केला होता.

‘‘मी बरीच वष्रे क्रिकेट खेळत आहे. माझ्यातील अहंकाराला मी महत्त्व देत नाही. याचप्रमाणे देशासाठी खेळताना वैयक्तिक आवडी-निवडी संघापुढे गौण ठरतात,’’ असे मितालीने सांगितले.