News Flash

पेरूचे स्पर्धेतील आव्हान कायम

पेरूने कोलंबियाचा २-१ असा पाडाव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील आव्हान कायम ठेवले आहे.

एपी, साव पावलो

पेरूने कोलंबियाचा २-१ असा पाडाव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील आव्हान कायम ठेवले आहे. सर्जियो पेना याने १७व्या मिनिटालाच पेरूला आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला कोलंबियाने जशास तसे प्रत्युत्तर देत सामन्यात बरोबरी साधली. ५३व्या मिनिटाला कोलंबियासाठी मिग्यूएल बोर्जा याने गोल साकारला. मात्र ६४व्या मिनिटाला कोलंबियाचा बचावपटू येरी मिना याने केलेल्या स्वयंगोलमुळे पेरूला विजय मिळवता आला.

या विजयासह पेरू ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानी पोहोचला असून कोलंबियाने तीन सामन्यांत चार गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. ब्राझीलने दोन्ही लढती जिंकून सहा गुणांची कमाई करत अग्रस्थान कायम राखले आहे. गटातून चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

‘‘कोपा अमेरिका स्पर्धेत या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आम्ही चांगल्या स्थितीत असून पुढे चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असू,’’ असे पेरूचा बचावपटू रेनाटो तापिया याने सांगितले. पेरूला सलामीच्या सामन्यात ब्राझीलकडून ०-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर प्रशिक्षक रिकाडरे गॅरेसा यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

व्हेनेझुएलाची इक्वाडोरशी बरोबरी

रोनाल्ड हेर्नाडेझ याने भरपाई वेळेत पहिला आंतरराष्ट्रीय गोल करत व्हेनेझुएलाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत इक्वाडोरविरुद्ध २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. यामुळे इक्वाडोरला ‘ब’ गटात एक गुण मिळवता आला असून व्हेनेझुएलाकडे दोन गुण आहेत. इक्वाडोरने आर्यटन प्रेसियाडो (३९व्या मिनिटाला) आणि गोंझालो प्लाटा (७१व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे आघाडी घेतली होती. व्हेनेझुएलाकडून एडसन कॅस्टिलियोने (५१व्या मिनिटाला) गोल केला होता.

चिलीकडून करोना नियमांचे उल्लंघन

साव पावलो : चिली संघातील खेळाडूंनी कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यान करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले आहे. चिली संघाचे वास्तव्य असलेल्या क्युइबा शहरातील हॉटेलमध्ये एका न्हाव्याने अनधिकृतपणे प्रवेश केला होता. ‘‘चिलीच्या खेळाडूंकडून नियमांचा भंग झाल्याचे मान्य असून त्याचा आम्हाला खेद वाटत आहे. त्या न्हाव्याचा खेळाडूंशी संपर्क आलेला नाही. त्यानंतर सर्व खेळाडूंचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे,’’ असे चिली फुटबॉल महासंघाकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 1:45 am

Web Title: peru challenge in the tournament remains football ssh 93
Next Stories
1 गोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र
2 चांगला मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागार गमावला!
3 Euro Cup 2020: नेदरलँडचा सलग तिसरा विजय; नॉर्थ मसेडोनियाचा ३-० ने पराभव
Just Now!
X