हिंगिससह वर्षांतील तिसरे ग्रॅण्ड स्लॅम
भारताचा ४२ वर्षीय टेनिसपटू लिएण्डर पेसने अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत मिश्र दुहेरीचा किताब पटकावून इतिहास घडवला. पेसने स्वित्र्झलडची नावाजलेली टेनिसपटू मार्टिन हिंगिससह जेतेपदाला गवसणी घालून चालू वर्षांत सर्वात यशस्वी खेळाडूचा मानही मिळवला. चौथ्या मानांकित पेस-हिंगिस जोडीने अमेरिकेच्या बेथानी मॅटीक-सॅण्ड्स आणि सॅम क्वुरी यांच्यावर ६-४, ३-६, १०-७ असा विजय मिळवला. पेस-हिंगिस जोडीचे हे या वर्षांतील तिसरे प्रमुख स्पध्रेतील जेतेपद आहे. याआधी या जोडीने ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅममध्ये बाजी मारली होती. या तिहेरी धमाक्यामुळे १९६९ नंतर एका सत्रात मिश्र दुहेरीचे तीन ग्रॅण्ड स्लॅम नावावर करणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे.पेसचे हे मिश्र दुहेरीचे नववे जेतेपद असून त्याने भारताच्या महेश भूपतीच्या (८) विक्रमाला मागे टाकले.
मिश्र दुहेरीत सर्वाधिक दहा जेतेपद नावावर असलेल्या मार्टिना नवरातिलोव्हाचा विक्रम पेसला आता खुणावत आहे. या दहा जेतेपदांत पेससह नवरातिलाव्हाने २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि विम्बलडन स्पध्रेतील जेतेपद पटकावली आहेत. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेस-हिंगिस जोडीने सुरुवातीपासून प्रहार करताना पहिल्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. हिंगिसने जबरदस्त फोरहॅण्ड लगावात ब्रेकपॉइंट मिळवला. ५-४ अशा आघाडीवर असताना हिंगिसने व्हॉली विनर लगावून पहिला सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये अमेरिकन जोडीने ३-१ अशी आघाडी घेत पेस-हिंगिसवर दडपण निर्माण केले. त्यातही पेस-हिंगिसने शानदार खेळ केला, परंतु या वेळी त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि अमेरिकन जोडीने दुसऱ्या सेटसह सामना १-१ असा बरोबरीत आणला. टायब्रेकरमध्ये रंगलेल्या सेटमध्ये बिगरमानांकित अमेरिकन जोडीने ४-१ अशी आघाडी घेतली, परंतु पेस-हिंगिसने चुरशीचा खेळ करून ७-७ अशी बरोबरी मिळवली. या बरोबरीनंतर पेस-हिंगिसने बाजी मारून कोर्टवर जल्लोष केला. एकूण १७ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पेसच्या, तर १९ हिंगिसच्या नावावर आहेत. हिंगिसने भारतीय खेळाडूंसह चारही ग्रॅण्ड स्लॅमची जेतेपद जिंकली आहेत. २००६ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेत हिंगिसने महेश भूपतीसह मिश्र दुहेरीत बाजी मारली होती. मिश्र दुहेरीपाठोपाठ हिंगिस महिला दुहेरीच्या जेतेपदाच्या शर्यतीत आहे. भारताच्या सानिया मिर्झासह हिंगिसला मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत कजाकस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेडोव्हा आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅसी डेलेक्युआ यांच्याशी सामना होणार आहे.

लिएण्डर आणि हिंगिस यांनी पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ केला. जेतेपदासाठी त्यांचे अभिनंदन. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अत्यानंद झाला आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मार्टिनाकडे असलेले तंत्र आणि क्षमता माझ्याकडे नाही, परंतु आपले ध्येय पूर्ण करण्याचे धाडस माझ्यात आहे. त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करतो. चिकाटी हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. यशासाठी सतत मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न असतो. डेव्हिस चषक हे पुढील ध्येय आहे.
– लिएण्डर पेस