‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ पूर्ण करण्यात अपयश
इटलीची रॉबर्टा व्हिन्सी अंतिम फेरीत
अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचे ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ विक्रमाचे स्वप्न भंग पावले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या महिला एकेरीतील उपांत्य फेरीत सेरेनाला जागतिक क्रमवारीत ४३व्या स्थानावर असलेल्या इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीने पराभूत केले. व्हिन्सीने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना २-६, ६-४, ६-४ असा विजय साजरा करत अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत तिच्यासमोर २६व्या क्रमांकावर असलेल्या तिच्याच देशाच्या फ्लॅव्हिआ पेनेट्टाचे आव्हान असणार आहे. पेनेट्टाने उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित सिमोना हालेपवर ६-१, ६-३ असा विजय साजरा केला. १९८८ साली स्टेफी ग्राफ यांच्यानंतर ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’ पूर्ण करण्याच्या निर्धाराने सेरेना कोर्टवर उतरली होती. मात्र, तिला अपयश आले.