इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने पीटर हँडस्कॉम आणि जॉन हॅस्टिंग यांना संघात स्थान दिले आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे अष्टपैलू शेन वॉटसन आणि स्नायू दुखावल्यामुळे नॅथन कल्टर निले यांना संघातून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी या दोन खेळाडूंची संघात वर्णी लागली आहे. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली असून मालिकेत अजून तीन सामने बाकी आहेत.
व्हिक्टोरिया संघातील हँडस्कॉम आणि हॅस्टिंग या दोघांना त्यांच्या स्थानिक संघातील आरोन फिंचची साथ या संघात लाभणार आहे. लॉर्ड्सवरील सामन्यामध्ये धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला डाव्या हाताच्या अंगठय़ाला दुखापत झाली आहे.
याबाबत संघाचे प्रशिक्षक डॅरेन लिहमन म्हणाले की, ‘‘डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन आणि नॅथन कल्टर निले हे जायबंदी झाल्याने आम्ही थोडेसे निराश नक्कीच आहोत. पण त्यांच्या जागी आरोन फिंच, पीटर हँडस्कॉम आणि जॉन हॅस्टिंग या गुणवान खेळाडूंना आम्ही संघात स्थान दिले आहे.’’
हँडस्कॉमने यापूर्वी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, पण हॅस्टिंगने पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एका सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हा सामना २०१२ साली खेळवण्यात आला होता, त्याचबरोबर ११ एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने तो खेळला आहे.