helmet1

फिल ह्युजेसच्या घटनेनंतर क्रिकेटमधील सुरक्षा व्यवस्थापनाच्या साहित्यसामग्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ह्युजेसने जुने आणि कमी जाडीचे हेल्मेट वापरले होते, असे स्पष्टीकरण ‘मसुरी’ या हेल्मेट निर्मिती कंपनीने स्पष्ट केले आहे.
ब्रिटनस्थित कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ह्युजेसने शेफिल्ड शिल्डच्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याप्रसंगी नव्या प्रकारचे हेल्मेट वापरण्याऐवजी जुने हेल्मेट परिधान केले होते. कंपनी सध्या या घटनेच्या व्हिडीओ चित्रीकरणाचा अभ्यास करीत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रांना या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ”या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रीकरण सध्या ‘मसुरी’कडे आले आहेत. चेंडू हेल्मेटच्या ग्रिलमधून ह्युजेसच्या डोक्यावर आदळला. ‘मसुरी’चे आधुनिक कसोटी हेल्मेट त्याने वापरले असते, तर असे घडले नसते.” ‘मसुरी’ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बाजारात आणलेले नवे हेल्मेट हे फलंदाजाच्या डोक्याच्या मागील भागाचे रक्षण करते, परंतु ह्युजेसने हे हेल्मेट वापरले नव्हते.