फिलिप आयलँड टेनिस स्पर्धा

भारताच्या अंकिता रैना हिने रशियाची साथीदार कॅमिला राखीमोव्हा हिच्या साथीने संघर्षपूर्ण विजय मिळवत पहिल्यावहिल्या डब्ल्यूटीए जेतेपदावर नाव कोरले. अंकिता-कॅमिला जोडीने फिलिप आयलँड करंडक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या जोडीवर विजय मिळवला.

अंकिता-कॅमिला जोडीने अ‍ॅना ब्लिंकोव्हा आणि अ‍ॅनास्तेशिया पोटापोव्हा यांच्यावर २-६, ६-४, १०-७ अशी मात केली. या कामगिरीमुळे अंकिताने महिला दुहेरीत ९४व्या स्थानी मजल मारली आहे.

अव्वल १०० जणींमध्ये स्थान मिळवणारी अंकिता ही सानिया मिर्झानंतरची भारताची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी अंकिताने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत मुख्य फेरीत स्थान मिळवले होते.

आता एकेरीत अव्वल १०० जणींमध्ये स्थान पटकावण्याचे माझे उद्दिष्ट आहे. कॅमिलासोबत मी पहिल्यांदाच खेळत होते. या स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या २० मिनिटेआधी आम्ही एकत्र आलो होतो. कॅमिला ही आक्रमक खेळाडू असून ताकदवान फटके लगावते. आता कामगिरीत सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असेल.

– अंकिता रैना