फिल ह्य़ुजेसच्या निधनाच्या धक्क्यातून क्रिकेट विश्व अजूनही सावरलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ तर पूर्णपणे कोलमडला आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागणार असल्याचे समजताच ब्रिस्बेन येथे होणारा बोर्डर-गावस्कर चषकातील पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने घेतला असला तरी तो कधी खेळवण्यात येणार याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
फिलची शोकसभा ३ डिसेंबरला त्याच्या मॅक्सव्हिल या गावी आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्हीही संघ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ४ डिसेंबरला होणारा पहिला कसोटी सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘‘फिलचे आकस्मिक निधन झाल्याने क्रिकेट विश्व हळहळले आहे. या दु:खातून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अजूनही सावरलेले नाहीत. ते अजूनही भावनाविवश आहेत. त्यामुळे त्यांना या दबावाखाली पहिला सामना खेळावा लागेल. खेळाडूंच्या हितालाच आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच पहिला कसोटी सामना आम्ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून भारतीय क्रिकेट मंडळानेही आम्हाला याबाबत पाठिंबा दिला आहे. हा आमच्यासाठी सर्वात कठीण काळ आहे,’’ असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी पत्रकात म्हटले आहे.
सदरलँड यांनी पत्रकामध्ये सामना पुढे ढकलणार असल्याचे म्हटले असले तरी त्यांनी हा सामना किती दिवस पुढे ढकलण्यात येईल, याबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे या सामन्याची तिकिटे विकत घेतलेले क्रिकेट रसिक संभ्रमात आहेत.
याबाबत भारतीय संघाचे प्रवक्ते आर. एन बाबा म्हणाले की, ‘‘ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आम्हाला पहिला कसोटी सामना एक दिवस पुढे ढकलणार असल्याचे सांगितले आहे.’’