संघ सहकारी आणि लहान भावाप्रमाणे असणाऱ्या फिलीप ह्य़ुजेसच्या अंत्यसंस्कारात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क सहभागी होणार आहे. ह्य़ुजेस याच्यावरील अंत्यसंस्कार विधींमध्ये शवपेटी खांद्यावर वाहून नेणाऱ्या लोकांमध्ये क्लार्कचा समावेश आहे. क्लार्कच्या साथीला ऑस्ट्रेलियाचा ट्वेन्टी-२० कर्णधार आरोन फिंचवरही ही जबाबदारी असणार आहे. अंत्यविधीनंतर होणाऱ्या शोकप्रार्थनेचे नेतृत्व क्लार्कच करणार आहे. अंत्यविधी संदर्भातील तपशील क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी जाहीर केला.
अंत्यसंस्काराला लारा, वॉर्नची उपस्थिती
ह्य़ुजेसच्या जन्मगावी मॅक्सव्हिले येथे होणार असलेल्या अंत्यसंस्कार सोहळ्याला मार्क टेलर, सर रिचर्ड हॅडली, ब्रायन लारा, शेन वॉर्न, माइक हसी, रिकी पॉन्टिंग, ब्रेट ली, अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि ग्लेन मॅकग्रा हे मान्यवर खेळाडू उपस्थित राहणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट हेही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघातर्फे संघसंचालक रवी शास्त्री, प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यासह विराट कोहली, रोहित शर्मा आणि मुरली विजय तसेच व्यवस्थापक अर्शद अयूब हे सर्व जण अंत्यविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.