भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरोधात टी २० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण दुसऱ्या सामन्यात भारताने आफ्रिकेवर ७ गडी राखून जिंकला. विराट कोहलीने दमदार नाबाद ७२ धावांची खेळी केली. तर दीपक चहरने २२ धावात २ बळी टिपले. या सामन्यात हार्दिक पांड्यानेही चांगली कामगिरी केली. त्याने ४ षटकात ३१ धावा दिल्या आणि १ बळी टिपला. फलंदाजीत मात्र त्याला संधी मिळाली नाही. पण पुढील सामन्यात त्याच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

कर्णधार विराट कोहली याने युवा क्रिकेटपटूंना काही दिवसांपूर्वीच सूचक इशारा दिला आहे. स्वत:ला लवकरात लवकर सिद्ध करा कारण तुम्हाला जास्तीत जास्त ४ ते ५ संधी मिळतील असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, खलील अहमद या खेळाडूंना स्वत:च्या खेळीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. याच दरम्यान, नुकताच टीम इंडियाच्या युवा खेळाडूने एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत त्या खेळाडूने आपल्या कठीण दिवसांबाबत लिहिले आहे. त्याला सुरूवातीच्या काळात खेळण्यासाठी ट्रकमधून प्रवास करावा लागत होता, असे त्या खेळाडूने फोटोत म्हटले आहे.

हा खेळाडू म्हणजे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या. त्याने आपला ट्रकमधला एक जुना फोटो शेअर केला आहे. स्थानिक सामने खेळण्यासाठी ट्रकमधून करावा लागणारा प्रवास खूप काही शिकवून गेला. टीम इंडियासाठी आतापर्यंत केलेला प्रवासदेखील उत्तम आहे. माझं क्रिकेटवर मनापासून प्रेम आहे, असंही त्याने लिहिले आहे.