श्रीशांतच्या ई-मेलवर असलेल्या मॉडेल्सच्या शेकडो छायाचित्रांचे गूढ कायम असले तर ही छायाचित्रे जाहिरातीसाठी असलेल्या इच्छुक मुलींची नक्कीच नव्हती असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. हे प्रकरण खूप नाजूक असल्याने पोलीस सावधगिरीने याचा तपास करत आहेत.
श्रीशांतला अटक केल्यावर त्याचा लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. त्याच्या आयफोनमध्ये चारशे ते पाचशे मुलींचे मोबाइल क्रमांक आढळले होते. तर त्याच्या ई-मेलमध्ये पोलिसांना शेकडो मुलींची छायाचित्रे आढळली होती. बॉलिवूडच्या एका कास्टिंग डायरेक्टरने ही छायाचित्रे पाठवली होती. सध्या या कास्टिंग डायरेक्टरची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. श्रीशांतच्या एस ३६ या कंपनीला एक जाहिरातपट बनवायचा होता. त्यासाठी लागणाऱ्या मॉडेल्सच्या निवडीसाठी ही छायाचित्रे पाठविल्याचा दावा या कास्टिंग डायरेक्टरने केला होता. पण मुंबई पोलिसांना त्या दाव्यात सत्यता वाटत नाही. जाहिरातपटासाठी केवळ मुलींचीच छायाचित्रे का घेण्यात आली व श्रीशांतची कंपनी जाहिरात बनविणार नव्हती. मग श्रीशांतला मुलींची छायाचित्रे पुरविण्यामागे उद्देश काय याचा पोलीस तपास करत आहे. यामागे वेगळाच उद्देश असावा असे पोलीस सूत्रांनी सांगितले.