केवळ भाषा आणि अंकांबाबत साक्षर करताना मुलांच्या शारीरिक साक्षरतेकडे दुर्लक्ष करणे भवितव्याच्या दृष्टीने घातक आहे. बालवयातच त्यांचे चालणे, पळणे, उडय़ा मारणे अशा तंदुरुस्तीकडे आणि विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक पालकाने मुलांच्या अभ्यासाइतकेच त्यांच्या खेळांनादेखील महत्त्व द्यावे, असे भारताचा माजी बॅडमिंटनपटू आणि सायना-सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी नमूद केले.

मुंबईकरांनी विविध प्रकारच्या खेळांमध्ये अधिकाधिक प्रमाणात सहभागी व्हावे, या उद्देशाने सुरू झालेल्या ‘मुंबई गेम्स’ या उपक्रमाच्या औपचारिक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ‘‘रांगणे, चालणे, तोल सांभाळणे, पळणे, उडय़ा मारणे या प्राथमिक क्रियांद्वारेही आपला मेंदू विकसित होत असतो. तसेच घरातील प्रत्येक सदस्याने आवडत्या खेळाचा मनमुराद आनंद घ्यावा. शालेय स्तरावर अधिकाधिक मुलांना खेळांमध्ये सहभागी करण्याबाबत प्रोत्साहित करायला हवे. मात्र, त्याबाबत बंधनकारक नियम बनवले जाऊ नयेत, असे वाटते. एखाद्याकडे चांगला मोबाइल, अधिक पैसे किंवा कार असणे, हे समृद्धीचे लक्षण आहे; पण कुणाचा पळण्याचा वेग चांगला, कोण अधिक उंच उडी मारू शकतो, अशा स्पर्धा जर आपापसांत, कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये लावल्यास, सर्वाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय बॅडमिंटनपटूंचे यश समाधानकारक

भारतीय बॅडमिंटनपटूंना काही स्पर्धामध्ये अपयश आले असले तरी आशियाई, राष्ट्रकुलसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये बऱ्यापैकी यश मिळाल्याचे समाधान वाटते. यंदा स्पर्धाचे प्रमाण अधिक असल्याने आणि खेळाडूंना एका स्पर्धेतील अपयशातून बाहेर पडून सराव करण्यासाठीदेखील कमी वेळ मिळाल्याने अनेक स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंना विजेतेपदापासून वंचित राहावे लागल्याची खंत आहे. चांगले प्रशिक्षक निर्माण व्हावेत, यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सायना, सिंधूपाठोपाठ सरस बॅडमिंटनपटू पुढे येण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असल्याने भारताचे बॅडमिंटनमधील भवितव्य उज्ज्वल आहे, असे गोपीचंद म्हणाले.