ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडिलेड येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याने क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला जाणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूंचा उपयोग होणार असून त्याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कसोटीच्या १३८ वर्षांच्या इतिहासात विद्युत प्रकाशातील कसोटीद्वारे प्रेक्षकांना पुन्हा या स्वरूपाच्या सामन्यांकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कसोटी सामन्यांकडे प्रेक्षकांची पाठ फिरविली जात आहे. त्यामुळेच त्यांना वेगळ्या क्रिकेटचा आनंद मिळवून द्यावा या हेतूनेच दिवस-रात्र स्वरूपाचे कसोटी सामने आयोजित करण्याचा निर्णय संघटकांनी घेतला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य जेम्स सुदरलँड यांनी सांगितले, मला जरी ट्वेन्टी-२० सामने आवडत असले तरीही कसोटी क्रिकेट हाच या खेळाचा आत्मा आहे व आजीवन मी त्याच्यावर प्रेम करीत राहीन. कसोटीचे हे नवे स्वरूप चाहत्यांना पसंत पडेल अशी मला खात्री आहे.
हा सामना दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात दिवस स्वरूपाच्या कसोटीस प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटीस प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुलाबी चेंडूं बाबत खेळाडूंकडून काही तक्रारी आल्या असल्यामुळे संयोजकांना पेचात टाकले आहे. हे चेंडू लवकर खराब होतात अशी टीका काही खेळाडूंनी केली आहे. मात्र आगामी कसोटीसाठी सुधारित चेंडूंचा उपयोग केला जाणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.
हा चेंडू उत्पादन करणाऱ्या कुकाबुरा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रेट एलियट यांनी सांगितले, एरवी सामान्य चेडूंची जेवढी चाचणी घेतली जात नसेल एवढी चाचणी आम्ही गुलाबी चेंडूंची घेतली आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडूंकडून याबाबत मत घेत व सूचना घेत आम्ही हे चेंडू तयार केले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महासंघाचे प्रमुख टोनी आयरीश यांनी सांगितले, कसोटी सामने खेळण्यास सर्वच खेळाडू प्राधान्य देत असतात. त्यामुळेच आगामी दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटीबाबत आता भाष्य करणे योग्य नाही. प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरीच्या आधारेच त्याबाबत मत व्यक्त करणे उचित ठरेल. माजी कसोटीपटू व क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सदस्य मार्क टेलर यांनी सांगितले, शंभर षटकांचा व चार दिवसांचा कसोटी सामना करणे हा कसोटीस उत्तम पर्याय होऊ शकतो. तसेच प्रत्येक कसोटी सामना गुरुवारी सुरू करावा म्हणजे शनिवार व रविवारी त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल.