‘‘प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता. चोर समजून आपण बाथरूमच्या दिशेने गोळ्या झाडल्या,’’ असे ‘ब्लेड रनर’ या टोपणनावाने ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा ऑलिम्पिक धावपटू  ऑस्कर पिस्टोरियसने आपल्या जबाबात म्हटले. रिव्हाची नियोजनबद्ध कट रचून हत्या केल्याचा आरोप पिस्टोरियसवर ठेवण्यात आला आहे. न्यायाधीश डेसमंड नायर यांच्यासमोर ऑस्करने आपली बाजू मांडली.
‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करायला आलेल्या रिव्हाला बाथरूममध्ये बंद करून ऑस्करने चार गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. ऑस्करने प्रिटोरिया येथील न्यायालयात आपल्याला जामिनावर मुक्त करावे, यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सरकारी वकील गॅरी नेल यांनी न्यायालयात सांगितले, ‘‘रिव्हाची हत्या करण्याच्या हेतूने ऑस्कर याने पिस्तुलात गोळ्या भरल्या आणि बाथरूमच्या दारातून त्याने रिव्हावर गोळ्या झाडल्या.’’
ऑस्कर याने न्यायालयात येताना काळा सूट, निळा शर्ट, राखाडी रंगाचा टाय असा पोशाख केला होता. त्याने हेतूपूर्वक ही हत्या केली नाही असे सिद्ध करण्यासाठी त्याचे कुटुंब प्रयत्न करीत आहे. तसेच त्याला जामीन मिळावा यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे. मात्र सरकार पक्षाने त्याला जामीन मिळू नये यासाठी त्याच्यावर अधिकाधिक आरोप कसे लावले जातील यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. हत्येच्या दिवशी नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे.
आपण निदरेष असल्याचे सिद्ध करण्यासाठी ऑस्कर अनेक कायदेपंडितांची मदत घेणार आहे. तसेच, त्याने ‘दी सन’ या इंग्लिश नियतकालिकाचे माजी संपादक स्टुअर्ट हिगिन्स यांची जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, रिव्हा हिचा पार्थिव देह येथे दफन करण्यात आला. या वेळी रिव्हाचे अनेक नातलग तसेच मॉडेलिंग क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या.  

‘‘बंगल्यात कोणीतरी घुसले असावे असा गैरसमज माझा झाला. ही व्यक्ती बाथरूममध्ये लपली असावी, या हेतूने मी तिथे गोळ्या झाडल्या. त्यामध्ये दुर्दैवाने रिव्हाचा अंत झाला. तिला मारण्याचा माझा हेतू नव्हता. आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते.’’
-ऑस्कर पिस्टोरियस

‘‘माझ्या मुलीची का अतिशय निर्दयीपणाने हत्या करण्यात आली आहे. तिला कोणीही शत्रू नव्हते. असा काय गुन्हा तिने केला की ऑस्करने तिची हत्या करावी, हे मला समजलेले नाही. ती अतिशय सुंदर तरुणी होती. आता फक्त तिचा निरागस चेहरा व पाणीदार डोळेच आमच्या स्मरणात राहणार आहेत.’’
-जुआन स्टीनकॅम्प (रिव्हाची आई)