भारतातील कसोटी सामन्यांसाठीच्या खेळपट्टय़ा या फारच कंटाळवाण्या असून त्या फलंदाजांना अपेक्षेपेक्षा जास्तच लाभदायक आहेत, अशी टीका इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने शुक्रवारी केली.

विशाखापट्टणम येथे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेली पहिली कसोटी आणि सध्या पुणे येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीची उदाहरणे देऊन वॉनने त्याचे मत अधिक प्रभावीपणे स्पष्ट केले. वॉन म्हणाला, ‘‘भारतातील कसोटी खेळपट्टय़ांमध्ये काहीच दम वाटत नाही. विशेषत: सामन्याचे पहिले तीन ते चार दिवस फक्त फलंदाजांचाच बोलबाला या खेळपट्टय़ांवर आढळतो. त्यामुळे गोलंदाजांवर अन्याय होतो, असे मला वाटते.’’

‘‘एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात गोलंदाजांना चुका करण्याची फार कमी संधी असते. त्यातच जर कसोटी सामन्यांमध्येही फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टय़ा बनवण्यात आल्या, तर गोलंदाजांसाठी काही शिल्लकच राहणार नाही. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका येथे पहिल्या दिवसापासूनच वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळतो, तर फिरकीपटूंनासुद्धा दिवसाच्या अखेरीस नक्कीच साहाय्य लाभते. परंतु भारत-आफ्रिका यांच्यातील पहिल्या दोन सामन्यांत फक्त फलंदाजांचेच वर्चस्व दिसून आले आहे,’’ असे ४४ वर्षीय वॉनने सांगितले.