प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम आता आपल्या उत्तरार्धाकडे झुकत चालला आहे. ८४ सामन्यांनतर दबंद दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर तीनवेळा स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा पाटणा पायरेट्स यंदा तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या प्ले-ऑफ आणि अंतिम फेरीचा सामना यंदा अहमदाबाद शहरात रंगणार आहे.

१४ ऑक्टोबरपासून प्ले-ऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार असून १९ ऑक्टोबर रोजी अंतिम फेरीचा सामना खेळवला जाणार आहे. दोन बाद फेरीचे सामने, उपांत्य आणि अंतिम असं यंदाच्या हंगामाचं अखेरच्या टप्प्यातलं चित्र असणार आहे. बाद फेरीचे सामने हे १४ ऑक्टोबर तर उपांत्य फेरीचा सामना १६ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. सहा संघांमध्ये प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाची अंतिम फेरी गाठण्याची चुरस असणार आहे, त्यामुळे यंदाच्या हंगामात कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.