गेल्या दोन महिन्यांपासून जास्त काळ संपूर्ण जगभरासह भारत देश करोना विषाणूच्या प्रादूर्भावाशी लढतो आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. ४ टप्प्यात लॉकडाउन राबवण्यात आल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत काही गोष्टी सुरु करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारही हळुहळु काही गोष्टी सुरु करत आहेत. या काळात देशातील मजूर, कामगार, शेतकरी यांचे चांगलेच हाल झाले. इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना या काळात अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागला. या कामगारांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहनेही या काळात अनेकांची मदत केली. अनेक कामगार व मजुरांची परिस्थिती पाहता हरभजनने एक चांगला विचार बोलून दाखवला आहे.

“खरं सांगायला गेलं तर एका पद्धतीने मी या सर्व परिस्थितीचे आभार मानेन. मी देखील इतरांची मदत करु शकतो याची जाणीव मला या काळात झाली. माझ्यातली माणुसकी यावेळी जागी झाली असं मी म्हणेन. मी सध्या जालंधर येथे एक शेतजमीन विकत घेऊन त्यावर फक्त गरजू व्यक्तींसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार करतो आहे. माझ्या आजुबाजूच्या परिसरातील मंदीर, इतर गरजू लोकांना हे अन्नधान्य देण्याचा माझा विचार आहे.” हरभजन आज तक वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

अनेक क्रिकेटपटूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत केली होती. हरभजन सिंहनेही घरी परतणाऱ्या कामगारांच्या जेवणाची जबाबदारी घेतली होती. सध्या लॉकडाउन काळात हरभजन आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय.