तिसऱ्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शुक्रवारी गुवाहाटी येथे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करताना दोन सुवर्णपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवळे याने पॉमेल हॉर्स प्रकारत सुवर्णपदक प्राप्त केले.

१७ वर्षांखालील गटात अस्मीने ४३.८० गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे हिने ४०.८० गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. या दोघींनीही दोरी आणि चेंडूच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या. अस्मीने याआधी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये ५ सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. अस्मी ही ठाणे येथील ज्ञानसाधना विद्यामंदिरची विद्यार्थी असून ती पूजा आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

मानस मनकवळे याने सुरेख लवचिकता दाखवताना सुरेख कसरती केल्या. मानसने १०.६५ गुण मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले. ठाणे येथे राहणारा मानस सरस्वती क्रीडा संकुलात महेंद्र बाभुळखर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्राच्या सिद्धी हातेकर हिने टेबल व्हॉल्ट प्रकारात रौप्यपदक मिळवले. मुलींच्या असमांतर बार्समध्ये सलोनी दादरकर आणि बॅलन्सिंग बीम प्रकारात इशिता रेवाळे हिने कांस्यपदक मिळवले.

कबड्डीत संमिश्र यश

कबड्डीमध्ये शुक्रवारी महाराष्ट्राला संमिश्र यश मिळाले. १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा मुलांचा संघ हरयाणाकडून १६-४४ असा पराभूत झाला. त्यानंतर २१ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राने यजमान आसामचा ४३-१२ असा धुव्वा उडवत आगेकूच केली. महाराष्ट्राने आसामवर लागोपाठ तीन लोण चढवत आपला विजय निश्चित केला होता. चढाई आणि बचाव अशा दोन्ही आघाडय़ांवर महाराष्ट्राने वर्चस्व राखले. सौरभ पाटील, अस्लम इनामदार आणि राजू काथेरे यांच्या खेळामुळे महाराष्ट्राने एकतर्फी विजय मिळवला. सकाळच्या सत्रात महाराष्ट्राचा संघ हरयाणाच्या आक्रमक आणि तुफानी खेळापुढे निष्प्रभ ठरला. चढाईपटूंवर भिस्त असताना महाराष्ट्राला आपला खेळ उंचावताच आला नाही.

तिरंदाजीत ईशा पवारला सुवर्णपदकाची संधी

महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत बाद फेरीत प्रवेश मिळवला. थंड हवामानातही आपले तीर भरकटणार नाहीत, याची काळजी महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी घेतली. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात ईशा पवारला सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे.