बांगलादेशच्या भारत दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर २२ नोव्हेंबरला हा पहिला सामना रंगणार आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत सलामीवीराची भूमिका बजावणारा रोहित शर्मा या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

“पहिल्या आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी आम्ही सज्ज आहेत. मी इतरांबद्दल सांगू शकत नाही, पण दुलीप करंडक स्पर्धेत मी एक सामना गुलाबी चेंडूवर खेळलो आहे. माझ्यासाठी तो अनुभव चांगला होता. दिवस-रात्र कसोटी सामना आमच्यासाठी संधी असल्यामुळे या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.” टी-२० मालिकेआधी रोहित शर्मा पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना या सामन्यासाठी निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्याला पंतप्रधान मोदी यांनी हजर रहावं यासाठी पंतप्रधान कार्यालयाला निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तसेच पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून २००० साली बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या संघाच्या सदस्यांचांही सन्मान करण्यात येणार आहे. त्यात सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. तसंच पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू, अभिनव बिंद्रा, एम. सी. मेरी कोम, पी. व्ही. सिंधू आदींनाही सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली.

अवश्य वाचा – ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीला दिग्गजांची हजेरी? BCCI लागलं तयारीला