आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावणारे माजी कुस्तीपटू करतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या काही खेळाडूंनी पुरस्कार परत करण्यासंदर्भात राष्ट्रपती भवनावर काढलेला मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. नव्या शेतकरी कायद्यासंदर्भात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जवळपास ३५ क्रीडापटूंनी आपले पुरस्कार केंद्र सरकारकडे परत करण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथून निघालेला हा मोर्चा पोलिसांनी कृषीभवन येथे रोखला.

करतार यांना १९८२मध्ये अर्जुन तर १९८७मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘‘शेतकऱ्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आमच्याच बांधवांवर लाठीचार्ज होताना आम्हाला असह्य़ वेदना होत आहेत. पंजाब पोलिसमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलो तरी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे,’’ असे करतार यांनी सांगितले.

दोन्ही गोष्टींची सरमिसळ टाळावी -‘आयओए’

खेळाडूंनी काढलेल्या मोर्चानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ‘‘शेतकरी आंदोलन आणि राष्ट्रीय पुरस्कार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. खेळाडूंनी आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे. पण दोन्ही गोष्टींची सरमिसळ करू नये. सरकारवर विश्वास ठेवावा,’’ असे बात्रा यांनी सांगितले.