आयसीसीने टी-२० विश्वचषक रद्द केल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी तयारी सुरु केली आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. सर्व संघमालकांना यावषियी प्राथमिक माहिती देण्यात आलेली असून…सर्व संघांनी परदेशवारीची तयारीही सुरु केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सह-मालक नेस वाडीया यांनी युएईमध्ये गेल्यानंतर प्रत्येक दिवशी खेळाडूंची करोना चाचणी व्हावी अशी मागणी केली आहे.

“मैदानात आणि मैदानाबाहेर वावरत असताना कडक नियम आखून देण्याची गरज आहे. प्रत्येकाने या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या होण्यासाठी यात कोणत्याही प्रकारे सूट मिळता कमा नये. खेळाडूंची प्रत्येक दिवशी चाचणी करावी असं माझं मत आहे. मी खेळाडू असतो तर प्रत्येक दिवशी माझी चाचणी करण्यास माझी काहीच हरकत नव्हती.” नेस वाडीया यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली.

यंदाचा आयपीएल हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचा नुकसान होण्याची शक्यता होती. यासाठी दोन महिन्यांपासून बीसीसीआयने या स्पर्धेच्या आयोजनासाठी तयारी सुरु केली होती. आयपीएलमधून मिळणाऱ्या निधीतून काही भाग बीसीसीआय स्थानिक क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर खर्च करतं. यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये होणार असली तरीही या स्पर्धेचं आयोजन हे बीसीसीआयसाठी खर्चिक असणार आहे. Emirates Cricket Board ला यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. याचसोबत खेळाडूंचा राहणं, त्यांचा प्रवास व इतर खर्च या सर्व गोष्टींचा भार बीसीसीआय आणि संघमालकांना घ्यावा लागणार आहे.