सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू भारतीय बॅडमिंटनच्या तारका. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शनाने सायनाने भारताचा झेंडा रोवला तर युवा सिंधूने लहान वयातच दिमाखदार प्रदर्शन करत भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सिद्ध केले. या दोघींमधील मुकाबल्यात सायनानेच बाजी मारली आहे. मात्र उबेर चषकाच्या निमित्ताने या दोघी भारताला जेतेपद मिळवून देण्याच्या उद्देशाने खेळणार आहेत. सायनासह खेळणार असल्यामुळे भारतीय संघाला मजबूती मिळाली आहे असे उद्गार युवा खेळाडू पी.व्ही.सिंधूने काढले.
‘सायना आणि मी दोघीही खेळणार असल्याने संघाला बळकटी मिळाली आहे. सायनाने एकेरीची पहिली आणि मी दुसरी लढत जिंकल्यास संघावरचे दडपण कमी होऊ शकते’, असे सिंधूने सांगितले. ‘आमच्या गटात थायलंड, कॅनडा आणि हाँगकाँग संघ आहेत. थायलंडचे आव्हान फसवे आहे. सायना रत्नाचोक इन्थॅनॉनविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे तर माझी लढत पॉर्नटिप बुरानप्रासविरुद्ध होईल. ती सातत्याने चांगली खेळत आहे. गेल्या ४-५ महिन्यात मी तिच्याविरुद्ध खेळलेली नाही. तिच्याविरुद्धची लढत महत्त्वपूर्ण आहे. तीन एकेरी लढतींपैकी एक सायना आणि दुसरी मी खेळणार आहे. दुहेरीत ज्वाला-अश्विनी जोडी जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे कच्चे दुवे असे आमच्या संघात काहीच नाही. आम्हाला बाद फेरीत आगेकूच करण्याची चांगली संधी आहे. स्पर्धेचा ड्रॉ आमच्यासाठी अनुकूल आहे. आम्ही चांगली कामगिरी करू’, असा विश्वास सिंधूने व्यक्त केला.
उबेर चषक ही स्वरुपाची स्पर्धा आहे. केवळ एकटय़ाचा विचार करून उपयोगाचे नाही. एकेरीच्या साथीने दुहेरीच्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. घरच्या मैदानावर सामने होणार असल्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा आम्हाला मिळणार आहे. अन्य संघही तुल्यबळ आहेत. कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. गोपीचंद सर, मधुमिता मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कसून सराव सुरू असल्याचे सिंधूने सांगितले.