मुंबई : केदार जाधवला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये लवकरच सूर गवसेल. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला जाताना याच खेळी त्याचा आत्मविश्वास उंचावतील, अशी आशा महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी व्यक्त केली.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्रातील पहिला क्रिकेटपटू ठरणारा केदार यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करीत आहे.

केदारविषयी भावे म्हणाले, ‘‘उर्वरित ‘आयपीएल’ सामन्यांकडे त्याने पूर्णत: लक्ष केंद्रित केले आहे. विश्वचषकापूर्वी दोन-तीन उत्तम खेळी तो साकारू शकला, तर विश्वचषक सामन्यांमध्ये त्याला फायदा होईल.’’

३७ वर्षीय केदार यंदाच्या हंगामात चेन्नईकडून नऊ सामने खेळला असून, त्याने एकूण १३६ धावा केल्या आहेत. यापैकी ५८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

‘‘केदार प्रत्येक सामन्याकडे विजयाच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याची तंदुरुस्ती दिसून येते. महाराष्ट्राच्या आणि विशेषत: पुण्याच्या क्रिकेटला केदारचा अभिमान वाटतो आहे,’’ असे भावे यांनी सांगितले.