बीसीसीआयचं ब्रेनचाईल्ड मानलं जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेने फार कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या १२ हंगामांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झालेली आहे. स्पर्धेची वाढती लोकप्रियता पाहून अनेक परदेशी खेळाडूही या स्पर्धेत खेळण्याची आतुर असतात. भारतामधले अनेक स्थानिक खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी धडपडत असतात, मात्र प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाहीत. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनाही कधीकधी आयपीएल संघात जागा मिळत नाही. अशा खेळाडूंना परदेशी टी-२० लिग खेळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सुरेश रैना आणि इरफान पठाण यांनी केली होती. चेन्नई सुपरकिंग्जचा माजी गोलंदाज मनप्रीत गोनीनेही रैना-पठाणची री ओढत बीसीसीआयला फटकारलं आहे.

“बीसीसीआयशी संलग्न असणारे असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली तर ते भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करु शकतात. यानंतर काही खेळाडू असेही आहेत जे फक्त रणजी आणि स्थानिक क्रिकेट खेळतात पण त्यांना आयपीएल संघात जागा मिळत नाही. अशा खेळाडूंना परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे. याच माध्यमातून त्यांना पैसे मिळू शकतील. बीसीसीआयने त्यांना संधीच दिली नाही तर ते परिवार कसा चालवतील?? रणजी खेळून घर-परिवार चालत नाही.” मनप्रीत गोनीने Sportskeeda संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपलं रोखठोक मत मांडलं.

सध्या जगभरात करोना विषाणूमुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. सर्व महत्वाच्या स्पर्धा या काळात बंद आहेत. काही देशांत क्रीडा विश्वावर अवलंबून असलेलं अर्थचक्र सुरु करण्यासाठी स्पर्धांना प्रेक्षकांविना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र भारतात बीसीसीआयने क्रिकेट सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आयपीएलचा तेरावा हंगामही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.