‘‘सध्या तरी चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजीला उतरावे, हे निश्चित करण्यात आले नाही. कोणीही कुणाचीही जागा घेऊ शकणार नाही. जर शक्य झाले तर आम्ही चौथे स्थान वगळून १,२,३,५,६ पासून १२व्या स्थानापर्यंत फलंदाजी केली असती. परंतु जो कुणी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, त्याच्यावर दडपण नसावे,’’ असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सचिनच्या चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला उतरेल, या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. परदेशी वातावरणात आणि सचिन तेंडुलकरशिवाय खेळण्याचे मोठे आव्हान दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघासमोर असेल. परंतु कसोटी मालिकेआधी एकदिवसीय मालिका असल्यामुळे भारतीय फलंदाजांना स्थिरावण्यास चांगली मदत होईल. त्यामुळे ही मालिका रंगतदार होईल, अशी आशा धोनीने प्रकट केली.
सचिनने नोव्हेंबरमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी सचिननंतरच्या काळाविषयी मत मांडताना धोनी म्हणाला, ‘‘प्रत्येकदा नवी सुरुवात असते, हे तुम्हाला लक्षात येईल.’’ भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
‘‘दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर वेग आणि उसळी आहे. त्यामुळे हे सर्वासाठीच आव्हान असेल आणि नव्याने काही शिकता येईल. संघातील काही खेळाडू तर प्रथमच परदेश दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जात आहेत. परंतु मालिका भारतात असो किंवा परदेशात, दडपण नेहमीच आपली सोबत करते. पण सध्या आपली कामगिरी चांगली होते आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे,’’ असे धोनी यावेळी म्हणाला.
दक्षिण आफ्रिका संघाविषयी धोनी म्हणाला, ‘‘दक्षिण आफ्रिकेचा संघही समतोल आहे. त्यांच्या संघातील अनेक खेळाडूंना दैवी देणगी लाभली आहे. याचप्रमाणे त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना आमच्यासाठी ते नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे.’’

गंभीर तिसरा सलामीवीर, परंतु संघात नसलेला -धोनी
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासोबत दोन नियमित सलामीवीर आहेत. तिसरा सलामीवीर म्हणून कोण भूमिका पार पाडेल, या प्रश्नाला उत्तर देताना धोनीने गौतम गंभीरचे नाव घेतल्यामुळे सर्वानाच आश्चर्य वाटले. कारण १७ सदस्यीय भारतीय कसोटी संघात गंभीरचा समावेश नाही. धोनी म्हणाला की, ‘‘गौतम हा निश्चितपणे आमचा राखीव सलामीवीर आहे. सध्या तरी विजय आणि शिखर सलामीसाठी चांगली कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे तिसरा सलामीवीर सध्या तरी गौतम आहे.’’ पत्रकार परिषदेच्या अखेरीस याबाबत स्पष्टीकरण करताना धोनी म्हणाला, ‘‘गंभीर संघात नाही, याची मला कल्पना आहे. परंतु तो आमचा तिसरा सलामीवीर आहे. परंतु तो संघाचा भाग आहे की नाही, हे मात्र मला विचारले नव्हते.’’