नवी दिल्ली : भारतीय महिला संघातील अष्टपैलू हरलीन देओलने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध हवेत सूर लगावून टिपलेल्या अफलातून झेलची चित्रफीत गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे चर्चेत आहे. रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर हरलीनच्या झेलचे कौतुक केले. भारत-इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतील शुक्रवारी झालेल्या पहिल्या लढतीत हरलीनने झेल टिपला. इंग्लंडच्या डावातील १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अ‍ॅमी जोन्सने टोलवलेला चेंडू हरलीनने सीमारेषेजवळ झेलला. यासंबंधी ‘अभूतपूर्व, शाब्बास, हरलीन देओल’ असा मजकूर जोडून मोदी यांनी तिच्या झेलची चित्रफीत पोस्ट केली. हा सामना भारताला पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमानुसार गमवावा लागला.