पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसे आहेत हे मी पाहू शकत नाही. मात्र त्यांच्याबद्दल खूप कौतुकास्पद ऐकले होते. नवी दिल्ली येथे विश्वचषक जिंकून आल्यानंतर त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. त्यातही मोदी यांनी माझी मराठी भाषेतूनच चौकशी केल्यामुळे मला गहिवरून आले. ही आठवण मी कधीही विसरणार नाही असे येथील दृष्टिहीन क्रिकेटपटू अमोल कर्चे याने ‘लोकसत्ता’ स सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या दृष्टिहिन खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रथमच विजेतेपद मिळविले. भारतीय संघात पुण्याच्या निवांत अंध मुक्त विकासालय संस्थेचा विद्यार्धी अमोल कर्चे याने प्रतिनिधित्व केले होते. या संघात निवड झालेला तो महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू होता. विजेतेपद मिळविल्यानंतर भारतात परतल्यानंतर या संघाचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अमोल याचे पुण्यात त्याच्या संस्थेतील सहकारी विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढीत जल्लोषात स्वागत केले. टीसीएस कंपनीतील व्यवस्थापक मिलिंद जाधव यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.
आफ्रिकेतील स्पर्धेविषयी अमोल म्हणाला, मी प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळत होतो. त्यामुळे मला त्याबाबत खूप उत्कंठा होती. साखळी गटात आम्हाला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मात्र हा पराभव होऊनही आम्ही अन्य सामन्यांमध्ये निर्धाराने खेळलो व अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम लढतीत पुन्हा आमच्यापुढे पाकिस्तानचे आव्हान होते. या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाने चार महिने खूप सराव केला होता. त्यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे सहकार्य लाभले होते. आम्ही केवळ वीस दिवसांच्या सरावाने स्पर्धेत उतरलो होतो. तरीही आम्ही अंतिम लढतीत पाकिस्तानला हरविले. मी या लढतीत दोन बळी घेत संघाच्या विजयास हातभार लावला याचा मला खूप आनंद झाला. विजेतेपद मिळविल्यानंतर आम्ही सर्व खेळाडू तेथील मैदानावर आनंदाने खूप रडलो. परदेशात आपणही तिरंगा फडकवू शकतो हीच आमच्यामध्ये भावना होती.
शासनाकडून काय मदत झाली असे विचारले असता अमोल म्हणाला, आम्हाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काहीही सहकार्य मिळाले नव्हते. मात्र केंद्र शासनाने आम्हाला आफ्रिकेत जाण्यासाठी २५ लाख रुपयांची मदत केली. त्यामुळेच आम्ही तेथे निर्धास्तपणे जाऊ शकलो. विजेतेपदाबद्दल केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयाकडून संघातील प्रत्येक खेळाडूला सहा ते सात लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. या बक्षिसांपेक्षा पंतप्रधानांसह सर्व ज्येष्ठ मंत्र्यांनी केलेले अभिनंदन हेच आमच्यासाठी मोठे पारितोषिक आहे.
अमोल हा बारामतीजवळील होळ या खेडेगावातील रहिवासी आहे. त्याचे आईवडील दोघेही शेतमजूर आहेत. अमोल याचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे. पुढील शिक्षणासाठी, निवांत संस्थेतील अन्य विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी व आईवडिलांच्या मदतीसाठी पारितोषिकाची रक्कम खर्च करण्याचे अमोलने ठरविले आहे. २०१६ मध्ये दृष्टिहिनांची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व करीत विश्वचषक जिंकण्याचे अमोल याचे ध्येय आहे.