धोनी तू नवीन भारताचा चेहरा आहेस. जिथे कुटुंब आणि अडनाव यापेक्षा तरुण स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केलं आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करत १५ ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिलं आहे. धोनीनेच ट्विटवरुन हे पत्र शेअऱ केलं आहे.

कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाचे आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असं त्यांना वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद, असं म्हणत धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेलं पत्र ट्विट केलं आहे.

काय म्हटलं आहे मोदींनी?

पत्राच्या सुरुवातीलाच मोदींनी धोनीने अगदी त्याच्या खास शैलीमध्येच म्हणजेच अनपेक्षितपणे निवृत्ती जाहीर केल्याचा उल्लेख केला आहे. “१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये म्हणजेच अनपेक्षितपणे एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत,” असं मोदी म्हणाले आहेत.

पुढे मोदींनी विश्वचषकातील शेवटचा सामना आणि तुझी फिनिशिंग स्टाइल कायम आमच्या स्मरणात राहणार असल्याचे म्हटलं आहे. “तुझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीकडे आकडेवारीच्या नजरेने पाहता येईल. तू सर्वात यशस्वी कर्णधार ठरलास. भारताला तू अग्रेसर बनवण्यामध्ये मोलाचे योगदान दिलं. इतिहासामध्ये तुझं नाव सर्वोत्तम फलंदाज आणि सर्वोत्तम कर्णधार आणि या खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नोंदवलं जाईल. कठीण प्रसंगी तिच्यावर निर्भर राहणे आणि सामना संपवण्याची तुझी शैली खास करुन २०११ च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सर्व सामान्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. तो पुढील अनेक पिढ्यांना लक्षात राहील,” असं पंतप्रधान म्हणतात.

धोनी प्रेरणास्थान

खेळाबरोबरच धोनीकडे त्याच्या खडतर प्रवासासाठी आणि प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाईल असंही मोदींनी म्हटलं आहे. “महेंद्र सिंह धोनी हे नाव केवळ खेळातील आकडेवारी आणि सामना जिंकण्याच्या शैलीसाठी लक्षात राहणार नाही. तुझ्याकडे केवळ खेळाडू म्हणून पाहणे चुकीचं ठरेल. तुझे योगदान हे आश्चर्यचकित करणारे आहे असंच म्हणता येईल. एका लहानश्या शहरामधून सुरु करुन तू राष्ट्रीय पातळीवर आला आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि महत्वाचं म्हणजे भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीस. तुझी प्रगती आणि कामगिरी ही करोडो भारती तरुणांना प्रेरणा देणारी आहे. तुझ्याप्रमाणे ते अगदी नावाजलेल्या शाळा, कॉलेजांमध्ये गेले नाहीत. त्यांचे कुटुंबही जास्त प्रभावशाली कुटुंबांपैकी नाही मात्र आपल्यामधील कौशल्याच्या जोरावर त्यांनी तुझ्याप्रमाणे यश मिळवलं आहे अशांसाठी तू प्रेरणास्थान आहेस. तू तरुण भारताचा खरा चेहरा आहेस. ज्या भारतामध्ये तुमचे अडनाव आणि कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे यावर त्यांचा प्रवास ठरत नाही तर तरुण स्वत: त्यांची ओळख निर्माण करुन वाटचाल करतात. आपण कुठून आलो आहोत यापेक्षा कुठे चाललो आहोत हे अधिक महत्वाचे असते याच नियमानुसार तू अनेक तरुणांना प्रेरणा दिली आहेस,” असं मोदींनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.

तरुण पिढी तुझ्यासारखीच

“मैदानातील तुझे अनेक निर्णय भारताच्या नवीन पिढीच्या विचारसणीची झलक दाखवतात. ही पिढी धोका पत्करण्यासाठी घाबरत नाही. तसेच कठीण प्रसंगातही ते एकमेकांच्या क्षमतेला वाव देतात आणि एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात. तुही अनेकदा सामन्यांमध्ये अटीतटीच्या क्षणी नवीन खेळांडूंवर विश्वास ठेवल्याचे आम्ही पाहिले आहेत. २००७ च्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना याचे उत्तम उदाहरण आहे. ही पिढी संयम सोडत नाही. हे तुझ्या अनेक खेळींमधून आम्ही अनुभवलं आहे. आताचे तरुण लवकर हार मानत नाहीत आणि ते प्रसंगांना तोंड द्यायला घाबरतही नाहीत. अगदी तू ज्या संघाचे नेतृत्व करत होतात त्याचप्रमाणे आहे सध्याची तरुण पिढी,” अशा शब्दांमध्ये मोदींनी धोनीचे आणि भारतामधील तरुणांचे कौतुकं केलं आहे.

जवानांबद्दल तुला प्रेम आहे

“तुझ्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तुला सुरक्षा दलाच्या जवनांबद्दल विशेष प्रेम आहेत. तू त्यांच्यासोबत असतानाही खूपच आनंदी असतो. त्यांच्यासाठीच्या अनेक कामांमध्ये तुला चिंता असते हे खरोखरच कौतुकास्पद आहे,” असं म्हणत मोदींनी धोनीला लष्कराबद्दल असलेल्या प्रेमाचे कौतुक केलं आहे.

साक्षी आणि झिवासाठी दोन शब्द

“साक्षी आणि झिवाला तुझ्याबरोबर अधिक वेळ मिळो. मी त्या दोघींनाही शुभेच्छा देतो. कारण त्यांनी केलेली तडजोड आणि पाठिंब्याशिवाय काहीच शक्य झालं नसतं. पर्सनल आणि प्रोफेश्नल लाइफमध्ये संयम कसा ठेवावे हे तरुणांनी तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. मला आठवत एका मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर सर्वजण विजयाची आनंद साजरा करत असताना तू तुझ्या मुलीबरोबर खेळत होता. खरोखरच तो व्हिंजेट धोनी होता. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा,” असं म्हणतं मोदींनी पत्राचा शेवट केला आहे.