इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

फ्रान्सचा अनुभवी मध्यरक्षक पॉल पोग्बाने झळकावलेल्या निर्णायक गोलच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात बर्नलेवर १-० असा विजय मिळवला. या विजयासह युनायटेडने आठ वर्षांनंतर प्रथमच गुणतालिकेच्या अग्रस्थानी झेप घेतली.

बर्नले येथील टर्फ मूर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र दुसऱ्या सत्रात ७१व्या मिनिटाला मार्कस रशफोर्डच्या पासचे पोग्बाने सुरेखरीत्या गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर बर्नलेला बरोबरी साधण्याची संधी मिळाली नाही.

तूर्तास युनायटेडचे १७ सामन्यांतील ११ विजयासह ३६ गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील लिव्हरपूलपेक्षा ते तीन गुणांनी पुढे आहेत. यापूर्वी २०१२-१३च्या हंगामात अ‍ॅलेक फग्र्युसन यांच्या प्रशिक्षणाखाली युनायटेडने अशी कामगिरी केली होती. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या युनायटेड विरुद्ध लिव्हरपूल यांच्यातील सामन्याकडे तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अन्य लढतींमध्ये शेफिल्ड युनायटेडने न्यू कॅसलवर १-० अशी सरशी साधली. बिली शार्पने ७३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल नोंदवून शेफिल्डचा विजय साकारला. एव्हर्टनने वोल्व्हसला २-१ असे नमवले. अ‍ॅलेक्स ईवोबी आणि मायकेल कीन यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून एव्हर्टनला गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचवले.

२ पोग्बाने यंदाच्या हंगामातील १० सामन्यांत दोनच गोल नोंदवले आहेत. डिसेंबरमध्ये वेस्ट हॅमविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिला गोल केला होता.

९ प्रीमियर लीगमधील गेल्या ११ सामन्यांपैकी नऊ सामने मँचेस्टर युनायटेडने जिंकले असून दोन सामन्यांत त्यांना बरोबरी पत्करावी लागली आहे.

अ‍ॅटलेटिको अग्रस्थानीच

ला लिगा फुटबॉल

माद्रिद : ला लिगा फुटबॉलमध्ये अ‍ॅटलेटिको माद्रिदने अग्रस्थान कायम राखताना सेव्हियाचा २-० असा पराभव केला. बुधवारी झालेल्या या सामन्यात अँजेल कोरी (१७वे मिनिट) आणि सॉल निगुएझ (७६) यांनी अ‍ॅटलेटिकोसाठी प्रत्येकी एक गोल केला. अ‍ॅटलेटिकोच्या खात्यात १६ सामन्यांत ४१ गुण असून रेयाल माद्रिद १८ सामन्यांतील ३७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

एसी मिलान उपांत्यपूर्व फेरीत

इटालियन चषक फुटबॉल

मिलान : एसी मिलानने इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या सामन्यात टोरिनोला ५-४ असे नमवले. निर्धारित वेळेसह भरपाई वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पेनल्टी शूटआऊटमध्ये टोरिनोच्या थॉमस रिनकॉनने संधी गमावल्यामुळे एसी मिलानचा विजय पक्का झाला.