पोलंडविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना; रोनाल्डो विरुद्ध लेवांदोवस्की यांच्यात चुरस

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रॉबर्ट लेवांदोवस्की हे युरोपीय देशांमधील दोन वलयांकित फुटबॉलपटू युरो चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. पोर्तुगाल संघाला आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावून देण्याचे स्वप्न बाळणाऱ्या रोनाल्डोकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता मार्सेइल येथील व्हेलोड्रोम स्टेडियमवर पोर्तुगाल आणि पोलंड यांच्यात अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी चढाओढ रंगणार आहे.

युरो चषक स्पध्रेत सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या फ्रान्सच्या मायकेल प्लाटिनी (९) यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी रोनाल्डोला केवळ एका गोलची आवश्यकता आहे. सलग चार युरो स्पध्रेत गोल नोंदवणारा रोनाल्डो हा एकमेव खेळाडू आहे. ३१ वर्षीय रोनाल्डोला पोर्तुगालला एकदाही आंतरराष्ट्रीय स्पध्रेचे जेतेपद पटकावून देता आलेले नाही. २००४ साली त्यांना युरोच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. वयाचा विचार करता रोनाल्डोची ही अखेरची युरो स्पर्धा असू शकेल आणि त्यामुळे जेतेपदाने निरोप घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पण, साखळी सामन्यातील कामगिरी पाहता त्यांना पोलंड कडवी टक्कर देण्यास सक्षम आहे.

गटातील अखेरच्या सामन्यात हंगेरीला ३-३ अशा बरोबरीत रोखून पोर्तुगालने बाद फेरीत कसाबसा प्रवेश केला. त्या लढतीत रोनाल्डोचा परतलेला फॉर्म हीच पोर्तुगालसाठी दिलासादायक बाब. क्रोएशियाविरुद्ध मात्र त्याचा आक्रमकपणा गायब झालेला दिसला. १२० मिनिटांपर्यंत गेलेल्या सामन्यात रिकाडरे क्युरेस्माच्या गोलने पोर्तुगालला तारले आणि उपांत्यपूर्व फेरीचे तिकिट मिळवून दिले.

‘‘आमच्याकडे रोनाल्डोसारखा जगातील सर्वोत्तम आणि नॅनी, क्युरेस्मा आणि जाओ मारियो यांच्यासारखे प्रतिभावंत खेळाडू आहेत,’’ असे पोर्तुगालचा बचावपटू जोस फोंटे यांनी सांगितले.

क्रोएशियाविरुद्धच्या अतीबचावात्मक खेळामुळे पोर्तुगालवर टीका करण्यात आली होती. युरो स्पध्रेच्या इतिहासात ९० मिनिटांच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांकडून गोल करण्याचा प्रयत्न न झाल्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र, फोंटेने या टीकेची पर्वा करत नसल्याचे सांगितले. तो म्हणाला,‘ टीकाकारांच्या मते आम्ही खराब खेळलो, परंतु निकाल आमच्या बाजूने लागला. जर चित्र असेच राहणार असेल तर आम्ही पुढेही असाच खेळ करून. एक संघ म्हणून आम्हाला चांगला खेळ करायचा आहे आणि जिंकायचे आहे, परंतु काही वेळा ते शक्य होत नाही.’’

रोनाल्डो चांगल्या फॉर्मात नसल्याच्या चर्चाची पोलंडचा गोलरक्षक वॉसिएच झीसेस्नी याने खिल्ली उडवली. तो म्हणाला, ‘‘पोर्तुगाल हा चांगला संघ आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणजे संघ नव्हे. काही जण म्हणतात तो चांगल्या फॉर्मात नाही, परंतु आजही त्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक आहे. रोनाल्डो वगळता रेनाटो सांचेसनेही प्रभावीत केले आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत आमच्यासमोर खडतर आव्हान आहे.’’

पोलंडच्या लेवांदोवस्कीला मागील चार सामन्यांत अजून सुर गावसलेला नाही, परंतु ३४ वर्षीय खेळाडूने स्वित्र्झलडविरूद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल करून पोलंडला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. ‘‘रॉबर्टच्या कामगिरीची आम्हाला चिंता नाही,’’ असे पोलंडचे प्रशिक्षक हुबर्ट मॅलोविएज्स्की यांनी स्पष्ट केले.

०३

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील पोलंड आणि पोर्तुगाल यांच्यातील ही तिसरी लढत असून युरो स्पध्रेत पहिल्यांदा उभय संघ समोरासमोर आले आहेत. १९८६च्या विश्वचषक स्पध्रेत पोलंडने (१-०), तर २००२च्या विश्वचषकात पोर्तुगालने (४-०) असा विजय मिळवला.

११

फर्नाडो सँटोस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना पोर्तुगालने मागील ११ (८ विजय व ३ अनिर्णित) सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे.

२०१२

रॉबर्ट लेवांदोवस्कीने २०१२मध्ये युरो चषक स्पध्रेतील पहिल्या गोलची नोंद केली होती. त्यानंतर त्याला दुसरा गोल नोंदवण्यासाठी ६४३ मिनिटे वाट पहावी लागली.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने

३० जून : पोर्तुगाल वि. पोलंड

१ जुलै : वेल्स वि. बेल्जियम

२ जुलै : जर्मनी वि. इटली

३ जुलै : फ्रान्स वि. आइसलँड

सर्व सामने रात्री १२.३० वाजता