दुखापतीमुळे पोलंड कुस्ती स्पर्धेला मुकणार

पोलंड खुल्या कुस्ती स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. वर्षभरानंतर पहिल्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या दीपक पुनियाने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सराव करताना कोपराला झालेल्या दुखापतीमुळे पुनियाचे या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले.

‘‘स्पर्धेआधीच दीपक पुनियाला दुखापतीचा त्रास जाणवत होता, पण सरावादरम्यान त्याच कोपराला दुखापत झाल्याने त्याला हाताची हालचाल करता येत नव्हती. त्यामुळेच पुनियाला माघार घ्यावी लागली,’’ असे भारतीय संघासोबत असलेल्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आठ भारतीय कुस्तीपटूंपैकी पुनिया एक असून त्याच्या दुखापतीचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. सद्य:स्थितीत तो किमान एक आठवडा सरावाला मुकणार असल्याचे दिसत आहे. या स्पर्धेत पुनियाची उपांत्यपूर्व फेरीतील लढत अमेरिकेच्या झैद व्हॅलेंसियाशी होणार होती, पण पुनियाने माघार घेतल्याने प्रतिस्पध्र्याला पुढे चाल देण्यात आली आहे.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी सराव मिळावा म्हणून भारताने या स्पर्धेत चार खेळाडूंना संधी दिली होती. पुनियाच्या माघारीमुळे आता रवी दहिया (६१ किलो), विनेश फोगट (५३ किलो) आणि अंशू मलिक (५७ किलो) यांच्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दहियाची लढत जागतिक पदकविजेत्या नुरीस्लाम सानायेव्ह याच्याशी होईल. विनेशची लढत ११ जून रोजी होणार आहे. मात्र सध्या बुडापेस्ट येथे सराव करणारी विनेश अद्याप पोलंडमध्ये दाखल झालेली नाही. अंशूला ओडुनायो अदेकुरोयो हिच्याशी सामना करावा लागेल.

दीपक पुनियाची दुखापत फारशी गंभीर नसून चिंता करण्याची गरज नाही. भारतातच सराव करताना त्याला दुखापत झाली होती. पोलंडमध्ये स्पर्धेत सहभागी होण्याआधी ती उफाळून आली. ऑलिम्पिकसाठी तो पूर्ण जोशाने मैदानात उतरेल. सध्या तो दुखापतीनंतरही सराव करत आहे.

– जगमंदेर सिंग, राष्ट्रीय प्रशिक्षक