अविनाश पाटील

राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेची घोषणा

शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज (रविवारी) आयोजित ‘नाशिक मॅरेथॉन’ महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेविना होत आहे. पूर्ण ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉन आयोजनासाठी आवश्यक नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी राज्य संघटनेचे अधिकृत निरीक्षक उपस्थित राहणे आवश्यक असते. या मॅरेथॉनसाठी राज्य संघटनेनेने अधिकृत निरीक्षक पाठविण्यात येणार नसल्याचे नमूद केल्याने मॅरेथॉनमधील धावपटूंच्या कामगिरीच्या नोंदीवरही प्रश्नचिन्ह राहणार आहे.

‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी यांच्यासारख्या कर्तृत्ववान आंतरराष्ट्रीय धावपटूंमुळे नाशिकला ‘धावपटूंचे शहर’ अशी ओळख मिळू लागली आहे. ही ओळख अधिक वाढीस लागावी म्हणून काही वर्षांपासून शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने ‘मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येऊ लागले आहे. अर्थात त्यात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दरवर्षी जानेवारीत घेण्यात येणाऱ्या आणि तीन वर्षांपासून पोलीस आयुक्तालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मॅरेथॉनसह इतर एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी कमी अंतराच्या धावण्याच्या शर्यती घेतल्या जातात. नाव मात्र मॅरेथॉनचे दिले जाते.

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तीन वर्षांपासून वेगवेगळा सामाजिक संदेश देण्यासाठी नाशिक मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाची मॅरेथॉन स्त्री-पुरूष समानतेचा संदेश देण्यासाठी होणार आहे. मुख्य ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉनसह २१ किलोमीटर, १०, पाच आणि दोन किलोमीटर या अंतरासाठीही शर्यत घेण्यात येणार आहे. अनंत कान्हेरे मैदानापासून पहाटे सर्वप्रथम मुख्य मॅरेथॉन, त्यानंतर इतर गटांच्या शर्यतींना सुरुवात होईल. सर्व गटांसाठी एकूण ११ हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. मॅरेथॉनसाठी खास टी शर्टही तयार करण्यात आले असून शुक्रवारपासूनच त्यांचे वितरण अनंत कान्हेरे मैदानावरच सुरू करण्यात आले. ही मॅरेथॉन वैशिष्टय़पूर्ण होण्यासाठी व धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी धावन मार्गावर ठिकठिकाणी ढोल पथक, संगीत, बँड यांची साथ आहेच. पाणी, शक्तीवर्धक पेय, रूग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे.

नाशिक मॅरेथॉनमध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यातीलही धावपटू, तसेच काही विदेशीही सहभागी होत आहेत. मॅरेथॉनला अभिनेता विकी कौशल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

-सीताराम कोल्हे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा)

नाशिक पोलीस आयुक्तालयाने मॅरेथॉनसाठी राज्य संघटनेकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांना मॅरेथॉनसाठी आवश्यक अटी-शर्ती कळविण्यात आल्या. त्यात नियमानुसार धावन मार्ग असणे, त्याचे मोजमाप संघटनेच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली करणे आदींचा समावेश आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने नाशिक मॅरेथॉन राज्य संघटनेसाठी अनधिकृत ठरविण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी राज्य संघटनेचे कोणतेही अधिकृत निरीक्षक उपस्थित राहणार नाहीत. राज्य किंवा जिल्हा संघटनेशी संबंधित धावपटूंना सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. जर त्यांनी सहभाग घेतलाच, तर त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल.

-सतीश उच्छील, (सचिव, महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटना)