ट्वेंटी-२० आंतरराट्रीय विश्वचषकाला आजपासून पात्रताफेरीद्वारे नागपुरातून सुरुवात झाली. विश्वचषकाच्या मुख्य साखळी फेरीला १५ मार्चपासून नागपुरातूनच सुरुवात होणार आहे. यंदा नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची मांदियाळी असताना शहरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींचा व्यवसायही जोरात असणार आहे. क्रिकेटवर लागणाऱ्या सट्टय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्रिकेट बुकी शहर पोलिसांच्या रडारवर आहेत.

नागपुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकी आहेत. २०१४ मध्ये उघडकीस आलेल्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात नागपुरातील छोटू अग्रवाल आणि सुनील भाटिया यांचा समावेश आहे. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर ते जामिनावर बाहेर पडले. यांच्याशिवाय आज शहरात अजय राऊत, हृदयराज उर्फ राज जोसेफ अलेक्झांडर, जीतू कामनानी, कमलेश किशनचंद तलरेजा, संजय सुरेश आमेसर असे  बुकी आहेत. क्रिकेट सामन्यांवर लागणारा रोजचा सट्टा कोटय़वधींचा असतो. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा पोलिसांनी अजय राऊतच्या नरेंद्रनगर येथील फ्लॅटमध्ये चालणाऱ्या क्रिकेट सटय़ावर धाड टाकली होती. त्यानंतर कमलेश तलरेजा याच्या अडय़ावरही कारवाई करण्यात आली. आशिया चषक सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.आता विश्वचषकाला प्रारंभ होत आहे. उपराजधानीत क्रिकेटचे अनेक सामने आहेत. ही क्रिकेट रसिकांनी पर्वणी ठरत असताना क्रिकेट बुकीही क्रिकेट सट्टय़ाच्या माध्यमातून खोऱ्याने पैसा कमविण्याच्या लालसेत आहेत. त्यामुळे क्रिकेटवर लागणारा कोटय़वधींचा सट्टा रोखण्याचे मोठे आव्हान आहे. पोलिसांनीही हे आव्हान पेलत योजना आखल्याची माहिती मिळते. पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनी ही योजना आखली आहे. खास करून झोन-२ आणि झोन-३ च्या मध्ये क्रिकेट बुकीचे प्रमाण अधिक आहे. तेथील क्रिकेट बुकीच्या हालचाली टिपण्याचे काम सुरू असून गुप्त माहितीच्या आधारावर कारवाईस पोलीस सज्ज आहेत. एका ठिकाणी बसून क्रिकेटचा सट्टा चालवण्याची पद्धत बंद झाली आहे. ३-जी, ४-जी इंटरनेट सुविधा आणि मोबाईलच्या माध्यमातून चालत्या वाहनांतही सट्टा खेळला जातो. त्यामुळे कारवाईसाठी सट्टा नेमका कुठे सुरू आहे, याची पक्की माहिती असणे आवश्यक आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना पंटरला आर्थिक मदत करण्याची आणि गुप्त माहिती मिळविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी पोलीस निधीतून खर्च करण्यात येत असल्याची माहिती आहे.