महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपल्या एका गीतातून या जीवनालाच क्रिकेटची उपमा दिली होती. मध्य प्रदेशच्या धरमवीरसिंग पाल याने ती शब्दश सार्थ करून दाखविली आहे. पोलिओमुळे बालपणीच आलेल्या अपंगत्वावर मात करीत क्रिकेटमध्ये खंबीरपणे उभ्या असलेल्या धरमवीरचा क्रिकेट हा जणू श्वास आहे. तोच त्याचा ध्यास आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशच्या अपंगांच्या क्रिकेट संघाचा हा कर्णधार भारताच्या सामन्याला हमखास उपस्थित असतो. एवढेच नव्हे, तर सीमारेषेपलीकडे बॉलबॉय म्हणून काम करतो. गेली नऊ वष्रे तो हे असिधारा व्रत जपत आहे. आणि त्याचमुळे भारतीय क्रिकेट संघाचा बारावा अनधिकृत खेळाडू म्हणून आज तो ओळखला जात आहे.
सध्या तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने बंगळुरूमध्ये आहे. यानंतर तो सचिनच्या कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी मालिकेलाही हजेरी लावणार आहे. सचिन हा त्याच्या जीवनातील एक हळवा कोपरा. त्याने निवृत्तीच्या घोषणेने धरमवीरला जणू आपल्या क्रिकेट आयुष्यातील एक महत्त्वाचा भागच हरवल्यासारखे झाले आहे. ती वेदना त्याच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते.
धरमवीर सांगतो, ‘‘सचिनसारख्या खेळाडूविषयी मी काय बोलणार? तेवढा मी मोठा नाही. पण गेली दहा वष्रे मी त्याला जवळून ओळखतो आहे. त्याने २०१५च्या विश्वचषकापर्यंत खेळायला हवे होते. त्याच्या खात्यावर आणखी एक विश्वविजेतेपद मला पाहायचे होते. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तेव्हा मला खूप वाईट वाटले. पण आता सचिनच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका मी नक्की पाहणार आहे.’’
२००५मध्ये मोहालीत भारत आणि श्रीलंका हा एकदिवसीय सामना झाला. तो धरमवीरने पाहिलेला पहिला सामना. त्यानंतर आजवर त्याने ५२ कसोटी, १५६ एकदिवसीय आणि तब्बल १५० आयपीएलसहित ट्वेन्टी-२० सामने याचि देही याचि डोळा पाहिले आहेत. त्यातील काही सामन्यांत पाहिलेला सचिन आठवताना तो हरवून जातो. ‘‘२००७मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात राजकोटला एकदिवसीय सामना होता. त्याच्या सरावाप्रसंगी सचिनने गोलंदाजी केली, तेव्हा मी यष्टीरक्षण करीत होतो. सचिनसोबत खेळल्याचा तो आनंद अजूनही ताजा आहे. काही वर्षांपूर्वी गोव्याला भारतीय क्रिकेट संघाला सन्मानित करण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मलाही तेथे आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात सूत्रसंचालकाने माझे नाव घेतले, तेव्हा सचिनने ‘आजा यार’ म्हणून मला हाक मारली. ती हाक मी कदापि विसरणार नाही.’’
‘‘माझे क्षेत्ररक्षणही सचिनला खूप आवडायचे. तुझ्यामुळे आम्हाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची प्रेरणा मिळते, असे सचिन एकदा म्हणाला होता, तेव्हा तर मी भारावूनच गेलो होतो,’’ असे धरमवीर मोठय़ा आनंदाने सांगतो.
धरमवीरला २००८ मधील चेन्नईतील आणि २०११च्या विश्वचषक स्पर्धेतील बंगळुरूतील सचिनच्या खेळी सर्वात संस्मरणीय वाटतात. चेन्नईतील सामन्यात सचिनने दुसऱ्या डावात नाबाद १०३ धावांची खेळी साकारून भारताला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला होता. तर २०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत बंगळुरूला सचिनने १२० धावांची यादगार खेळी साकारली होती. परंतु तो सामना टाय झाला. धरमवीर म्हणतो, ‘‘अशा या महान खेळाडूच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये फार मोठी पोकळी निर्माण होईल. सचिन आहे म्हणून भारतीय क्रिकेट आहे. जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटची ओळख सचिन हीच आहे. पण काय करणार? सचिनने निर्णय तर घेतला आहे आणि आता त्यात बदल होणार नाही. जितके प्रेम त्याने भारतीय क्रिकेटला दिले आहे, तितकेच प्रेम आणि वैभव सचिनला मिळो.’’