भारताच्या नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर जगभरामधून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. मात्र आता ऑलिम्पिक संपल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी एका पोलंडच्या महिला भालाफेकपटूवर कौतुकाचा वर्षाव होतानाचं चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे. विशेष म्हणजे या भालाफेकपटूने सुवर्णपदक जिंकलेलं नसून रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं होतं. तरी तिच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि त्यामागील कारण आहे तिने केलेली सुवर्ण कामगिरी. या तिच्या कामगिरीसाठी तिला एक मोठं सरप्राइझही मिळालंय.

सध्या चर्चेचा विषय ठरत असणाऱ्या या महिला भालाफेकपटूचं नाव आहे, मारिया आंद्रेजीक. मारिया अवघ्या २५ वर्षांची असून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिने महिला भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. मात्र हे पदक पटकावल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तिने या पदकाचा लिलाव करण्याचं ठरवलं. या पदकासाठी तिला तब्बल १ लाख ९० हजार डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर १ कोटी ४१ लाख ४० हजार रुपयांची किंमत मिळाली. मात्र एकीकडे खेळाडू आपलं संपूर्ण आयुष्य ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी खर्च करत असताना मारियाने या पदकाचा लिलाव करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कारण वाचून तुम्हाला तिचा नक्कीच अभिमान वाटेल. मारियाने दिलेल्या माहितीनुसार तिने हे पदक खासगी पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय घेण्यामागे एका लहान मुलाचा जीव वाचवण्याचा हेतू होता.

मिलोसझेक माल्यसा नावाच्या एका लहान मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रीया करण्यासाठी तिला पैसे गोळा करायचे असल्याने तिने आपल्या पदकाचा लिलाव करण्याचं ठरवलं. या बाळाला अमेरिकेमध्ये जाऊन उपचार घेता यावेत म्हणून तिने पदक लिलावात काढलं. यासंदर्भात तिने फेसबुकवर माहिती दिलेली.


मारिया मेडलचा लिलाव करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अखेर हे मेडल पोलंडमधील झाबका या उद्योग समुहाने तिचं पदक विकत घेण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे तिला आवश्यक असणारी रक्कम आणि या बाळाच्या उपाचारांचा पुढील सर्व खर्च कंपनी करेल असं झाबकाने जाहीर केलं. त्याहून खास गोष्ट म्हणजे कंपनीने मारियाला एक खास सरप्राइज दिलं आहे. लिलावामध्ये अपेक्षित असणारे पैसे दिल्यानंतरही झाबका उद्योग समुहाने तिचं पदक तिला परत केलं आहे. हे पदक तुझ्याकडेच ठेव आम्ही बाळाला लागेल ती सर्व आर्थिक मदत करु असं तिला सांगण्यात आलं.

तिच्या दानशूर वृत्ताने आणि या छान निर्णयाने आम्ही फार प्रभावित झालो आहोत. आम्हाला तिचा अभिमान आहे आणि तिच्या या कामात आम्ही योगदान देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे, असं झाबकाने आपल्या सोशल नेटवर्किंग पेजवर ही बातमी शेअर करताना म्हटलं आहे.


सध्या जगभरामधून मारिया आंद्रेजीकच्या या निर्णयाबरोबरच तिच्या दानशूरपणाच्या वृत्तीचं कौतुक होताना दिसत आहे.