आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवसाच्या अंतरात दोन सामने झाले. दोनही सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र आयसीसीच्या स्पर्धा वगळता दोन देशांमध्ये क्रिकेट सामने होत नाहीत. तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे या दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने आयोजित केले जात नाहीत. मात्र राजकारण आणि क्रिकेट हे दोन वेगळे विषय असून क्रिकेटमध्ये राजकारणी मंडळींना हस्तक्षेप करू देऊ नये, असे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचित चेअरमन एहसान मणी यांनी व्यक्त केले.

राजकारणी आणि नेतेमंडळींनी क्रिकेटच्या मुद्यांपासून दूरच राहिले पाहिजे. कारण ही नेतेमंडळी क्रिकेटला राजकारणाचं साधन बनवतात, असे सडेतोड मत त्यांनी मांडले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोनही देशांमधील राजकीय संबंध कशा पद्धतीचे आहेत, हे आपणास माहिती आहे. पण तसे असले तरीही उभय देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा सुरु राहणे तितकेच महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

‘क्रिकेटमध्ये राजकीय मंडळी आणि राजकारण याचा हस्तक्षेप खपवून घेतला जाऊ नये, असे मला मनापासून वाटते. राजकारणी मंडळी काय म्हणतात, याकडे आपण लक्ष देता काम नये. ते खेळाचा राजकारणाचे साधन म्हणून वापर करतात. त्यामुळे दोनही देशाच्या क्रिकेट मंडळाने आपल्यामधील चर्चा सुरु ठेवल्या पाहिजेत आणि क्रिकेटच्या उन्नतीच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत, असे मणी यांनी नमूद केले.

क्रिकेट हे एखाद्या व्यक्तिपेक्षा किंवा राजकारणापेक्षा मोठे आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो, तेव्हा जगभरातून लाखो-करोडो प्रेक्षक सामना पाहतात. कोणीही राजकारणाची चिंता करत नाही. त्यामुळे दोन क्रिकेट बोर्ड या विचारासाठी एकत्र येतील, अशी आम्हाला आशा आहे. झाले ते होऊन गेले. आता पुढे जाण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.