हॉकी संघटनांमधले वाद खेळ आणि खेळाडूंचे कसे नुकसान करू शकतात याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई हॉकी संघटना भारतीय हॉकी महासंघाशी संलग्न होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी संलग्न असणाऱ्या हॉकी इंडियाचे सदस्यत्व स्वीकारले. मुंबईच्या संघटनेच्या या निर्णयाने हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
भारतीय हॉकी महासंघाची बंगळुरू येथे होणारी ६४वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सराव करण्याकरिता महिंद्रा स्टेडियमची सध्या मालकी असलेल्या राज्य सरकारकडे मैदानाची मागणी केली होती. क्रीडा व युवक सेवा मुंबई विभागाचे उपसंचालक एन. बी. मोटे यांनी सरावासाठी मैदान मुंबईच्या संघाला देण्याचे पत्र मुंबई हॉकी असोसिएशनला पाठवले होते. मात्र आता हॉकी इंडियानेच मुंबईत १७ वर्षांखालील अर्थात सबज्युनिअर गटाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मुंबई हॉकी संघटनेतर्फे सहा संघ खेळवण्यात येणार आहे. निवड चाचणीसाठी महिंद्रा स्टेडियमवर ११ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबत मुंबई हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष मंघासिंग बक्षी यांनी सांगितले की, ‘‘आमची निवड चाचणी स्पर्धा याआधीच निश्चित होती. बंगळुरूतील स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता कुणालाही अडचण येणार नाही.’’ त्यामुळे हॉकी प्रशासकांच्या कुरघोडीच्या या राजकारणात खेळाडूंचे नुकसान होत आहे, अशी चर्चा होत आहे.