11 December 2017

News Flash

असा पॉन्टिंग.. तसा पॉन्टिंग!

टास्मानिया हा ऑस्ट्रेलियामधल्या टग्यांचा प्रदेश.. तसा तोही टग्याच.. रात्री पाटर्य़ामध्ये राडे करणारा.. मैदानातही

प्रसाद लाड | Updated: December 1, 2012 2:57 AM

टास्मानिया हा ऑस्ट्रेलियामधल्या टग्यांचा प्रदेश.. तसा तोही टग्याच.. रात्री  पाटर्य़ामध्ये राडे करणारा.. मैदानातही हुज्जत घालून वादविवाद करणारा.. अशी त्याची पहिल्यांदा ओळख होती.. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियासारख्या व्यावसायिक संघात राहील की नाही ही शंका होती.. पण कालांतराने त्याने स्वत:मध्ये बदल करून घेतले आणि ऑस्ट्रेलियाचा तो सर्वात यशस्वी कर्णधार झाला.. समोरच्याच्या नजरेला नजर भिडवणारा, अरेला का रे म्हणून उत्तर देणारा, ‘किलिंग स्पिरिट’ ओतप्रोत भरलेला.. कोणत्याही गोलंदाजाशी भिडायला केव्हाही तयार असणारा.. देशाला दोन विश्वचषक जिंकून देण्याची किमया साधणारा असा हा रिकी पॉन्टिंग. पर्थ कसोटी सामन्यानंतर त्याने निवृत्ती घेण्याचे ठरवलेय, कोणाच्या जाण्याने कोणालाच फरक पडत नाही. पण क्रिकेटविश्वाला मात्र त्याची, त्याच्या बेधडक फलंदाजीची आणि त्याच्यातल्या चतुर नेतृत्वाची आठवण आल्यावाचून राहणार नाही.
जानेवारी १९९९ला सिडनीवर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला, त्याच रात्री हा पठ्ठय़ा तिथल्या किंग क्रॉस अलोन स्ट्रीटमधील बॉर्बन आणि बीफस्टेक नाइट क्लबमध्ये गेला, रात्रभर मद्यपान केले आणि पहाटे तिथल्या एका व्यक्तीशी त्याची बाचाबाची आणि पुढे मारामारी झाली. त्यानंतर सकाळी ओठ सुजलेला आणि डोळ्याच्या खाली काळा-निळा झालेला पॉन्टिंगचा उदास चेहरा साऱ्यांनी पाहिला. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी आणली होती. या गोष्टीच्या एक वर्ष आधी १९९८मध्ये कोलकात्यातील एकदिवसीय सामन्यात त्याने हरभजन सिंगशी पंगा घेतला आणि रात्री नाइट क्बलमध्ये दंगा केला. मुंबई आणि बंगळुरूमध्ये आल्यावर नाइट क्लबमध्ये जाणारा आणि रेस कोर्सवर सट्टा लावण्यात पॉन्टिंग अग्रणी असायचा.
पण हाच पॉन्टिंग जेव्हा जेनिफर कॉन्टोरच्या प्रेमात पडला आणि त्याने जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला त्यानंतर अधिक जबाबदारीने वागायला लागला. याचाच फायदा त्याला क्रिकेटमध्येही झाला. स्टीव्ह वॉने क्रिकेटला अलविदा केल्यावर त्या वेळचा उपकर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टला वगळून निवड समितीने पॉन्टिंगला कर्णधारपद दिले आणि त्यानेही २००३चा विश्वचषक संघाला जिंकून दिला. या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच अंमली पदार्थ सेवनप्रकरणी शेन वॉर्न संघातून बाहेर गेला होता, पण पॉन्टिंगने त्यानंतर केलेली संघबांधणी संघाला विश्वचषक देऊन गेली. अंतिम सामन्यात भारताविरुद्ध साकारलेल्या अफलातून १४० धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर २००७चा विश्वचषक जिंकून त्याने ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक विश्वचषक जिंकणारा कर्णधार, ही नवी ओळख निर्माण केली.
एकीकडे दोन विश्वचषक त्याने जिंकले खरे, पण ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी अ‍ॅशेस मालिका त्याने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा गमावली आणि पॉन्टिंग हळूहळू ऑस्ट्रेलियनांच्या मनातून एक कर्णधार म्हणून उतरला. कारण गेल्या १२० वर्षांमध्ये एवढी नाचक्की ऑस्ट्रेलियाला कधीच सहन करावी लागली नव्हती.
एक फलंदाज म्हणून तो तेवढाच जिगरबाजही होता. शंभराव्या कसोटी सामन्यात त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली. २००६ साली सिडनीच्या मैदानात त्याने पहिल्या डावात १२० धावा केल्या. त्यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ७६ षटकांत २८७ धावांची गरज होती. पॉन्टिंगने १५९ चेंडूंत नाबाद १४३ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. २००३मध्ये त्याने तब्बल तीन द्विशतके लगावली. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज होता. या वेळी भारताविरुद्ध सलग दोन सामन्यांत त्याने २४२ आणि २५७ धावांची खेळी साकारली होती.
धावा करण्याच्या बाबतीत जसा पॉन्टिंग मागे नव्हता, तसा तो ‘स्लेजिंग’च्या बाबतीतही मागे नव्हता. झहीर खान, हरभजन सिंग आणि ड्वेन ब्राव्हो यांच्याशी मैदानात झालेल्या चकमकी त्याच्या चांगल्याच गाजल्या. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना सौरव गांगुलीचा झेल मायकेल क्लार्कने गलीमध्ये पकडला. गांगुलीला झेल घेतला नसल्याचे वाटले, पण त्या वेळी पॉन्टिंगने पंचांनाच हा बाद असल्याची खूण केली आणि पुन्हा एकदा तो टीकेचा धनी ठरला. २०११च्या विश्वचषकात अहमदाबाद येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यावर त्याने ड्रेसिंग रूममधला ‘टीव्ही’ फोडला होता.
असा हा पॉन्टिंग आक्रमक, बेडर, बेधडक, खुनशी, मुंबईतच्या फलंदाजासारखा खडूस, कुणाचाही विचार न करता स्वत: जे वाटेल ते करणारा, पण तरीही पक्का व्यावसायिक. कारण अनेक लफडी करूनही तो एवढी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकला, तो त्याच्या धावांच्या जोरावरच. या वर्षी जानेवारीत भारताविरुद्ध अ‍ॅडलेडवर त्याची २२१ धावांची खेळी संस्मरणीय होती.  त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराबरोबर केली जायची. कारण त्याच्या खेळात आक्रमकतेबरोबर नजाकतही होती. पण त्यानंतर पॉन्टिंग फारसा लक्षात राहिलेला नाही. गेल्याच सामन्यात त्रिफळाचीत झाल्यावर तो तोल जाऊन खेळपट्टीवर पडला आणि त्याला कळून चुकले की आता काही यापुढे आपण व्यावसायिक क्रिकेट खेळू नये. एके काळी धावांची टाकसाळ त्याने उघडलेली असायची, शतकामागून शतके तो ठोकायचा, पण वाढत्या वयाची त्याला जाणीव झाली आणि त्यामुळेच निवड समितीने विचारायच्या आतमध्ये त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आणि मोकळा झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलियाची संस्कृती भिन्न असल्याने तो भारतीयांना कधीच आवडला नाही, पण ऑस्ट्रेलियाला मात्र त्याचा नक्कीच गर्व असेल. पॉन्टिंगच्या राज्यात एक काळ असा होता की, क्रिकेटविश्वातून त्यांचा सूर्य कधीच मावळणार नाही असे वाटायचे. पण दिवस फिरले, घराचे वासे फिरले आणि हाच त्यांचा राजा आता अखेरचा सामना खेळायला मैदानात उतरला आहे. पॉन्टिंग नावाच्या युगाचा अस्त होईल. त्याच्या जाण्याने संघात पोकळी निर्माण होईल की नाही माहिती नाही, पण तो क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ होता हे मात्र नक्की.

First Published on December 1, 2012 2:57 am

Web Title: ponting is like that