विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले सध्याचे दोन तरुण कर्णधार मानले जातात. सध्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टिव्ह स्मिथ एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगतो आहे. त्याच्या अनुपस्थितीत टिम पेनकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व आहे. मात्र विराट कोहली सर्वोत्तम की स्टिव्ह स्मिथ?? ही चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये अनेकदा ऐकायला मिळते. मात्र या दोन्ही खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कोण याचं उत्तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने दिलेलं आहे.

रिकी पाँटींगच्या मते सध्याच्या घडीला कोहली हा सर्वोत्तम खेळाडू आहे, मात्र स्टिव्ह स्मिथ मैदानात नसताना कोहली सर्वोत्तम खेळाडू ठरतो. त्यामुळे पाँटींगने मोठ्या खुबीने कोहली आणि स्मिथमध्ये अव्वल खेळाडूची निवड करताना स्मिथच्या पारड्यात आपलं दान टाकलं आहे. ऑस्ट्रेलियातील चॅनेल सेव्हन या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाँटींग बोलत होता. “सध्या स्टिव्ह स्मिथ खेळत नसल्यामुळे कोहली सर्वोत्तम खेळाडू ठरतो. जर सध्या स्टिव्ह स्मिथ खेळत असता तर मी दोघांमध्ये स्मिथचीच निवड केली असती.”

गेल्या ३-४ वर्षांमध्ये स्मिथने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी केलेलं काम हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे. मागच्या हंगामात अॅशेस मालिकेत त्याने केलेली फलंदाजी ही निव्वळ अप्रतिम होती. विराट कोहली मर्यादीत षटकांच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करतो. कसोटी क्रिकेटमध्ये सपाट खेळपट्टीवर त्याची फलंदाजी बहरते. मात्र खेळपट्टीत जराशी उसळी असली की कोहलीला फलंदाजी करताना अडचणी येतात. स्मिथने मात्र सर्व प्रकारच्या वातावरणात आपली फलंदाजी सुधारुन दाखवली आहे. पाँटींगने आपलं मत व्यक्त केलं. २०१८ वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणातील शिक्षेमुळे या दौऱ्यात स्मिथच्या सहभागाबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा कोणता खेळाडू कोहलीला आव्हान देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.